हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारी अनेक ठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. परंतु पालघरच्या वाडा येथे गणपती विसर्जनाच्यावेळी दोन जणांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या आहेत. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या घटना घडल्या असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे उत्साहात वाहून न जाता नागरिकांनी सतर्क राहून गणपती बाप्पाचे विसर्जन करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तिघांचा दुर्दैवी मृत्यू
बुधवारी सायंकाळच्या दरम्यान दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कोनसई येथील नाल्यात गेले असताना दोघांचा मृत्यु झाला आहे. तर गो-हे येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. नाल्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे जगत नारायण मौर्य( वय 38)सुरज नंदलाल प्रजापती अशी आहेत. तर प्रकाश नारायण ठाकरे यांचा गो-हे येथील तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या तिघांना देखील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा दुदैवी मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर गणेश भक्तांनी विसर्जनावेळी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.
सध्या संपूर्ण राज्यात गणेशोत्सवानिमित्त आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. अशा काळात प्रशासनाकडून देखील वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नागरिकांसाठी देखील काही नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. परंतु नागरिकांकडूनच त्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. शहरी भागात जरी कडक पोलीस भरती असला तरी ग्रामीण भागात हा बंदोबस्त जास्त प्रमाणात लावण्यात आलेल्या नाही. ग्रामीण भागातील नागरिक जास्त प्रमाणात तलावात आणि नाल्यात गणपतीचे विसर्जन करण्यासाठी जातात. त्यामुळे अशा ठिकाणी गेल्याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांच्यासोबत दुर्घटना घडलेल्या घटना समोर येतात.