नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक २०२० मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. अमित शहा यांनी ट्विट करून हे विधेयक जम्मू काश्मीरच्या नागरिकांसाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. या विधेयकामुळे गोजरी, पहाडी आणि पंजाबी यांसारख्या स्थानिक भाषांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असंही अमित शहा यांनी म्हटलं.
‘जम्मू काश्मीरच्या जनतेसाठी आज एक महत्त्वपूर्ण दिवस आहे जेव्हा लोकसभेत जम्मू – काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक मंजूर करण्यात आलंय. या ऐतिहासिक विधेयकासोबतच जम्मू काश्मीरच्या जनतेचं बहुप्रतिक्षित स्वप्न साकार झालंय’ असं ट्विट गृहमंत्री अमित शहा यांनी केलं.
काश्मिरी, डोगरी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या जम्मू – काश्मीरच्या अधिकृत भाषा असतील, असंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
‘मी या विधेयकाच्या माध्यमातून जम्मू काश्मीरच्या संस्कृतीच्या संरक्षणाप्रती आपल्या वचनबद्धतेसाठी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. मी जम्मू काश्मीरच्या बंधु भगिनींना हे आश्वासन देऊ इच्छितो की मोदी सराकार जम्मू काश्मीरचा गौरव परत मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही’ असंही शहा यांनी म्हटलं.
A momentous day for the people of J&K as Jammu Kashmir Official Languages (Amendment) Bill was passed in Lok Sabha. Kashmiri, Dogri, Urdu, Hindi and English will now be the official languages of J&K: Home Minister Amit Shah pic.twitter.com/48eMJI3bgr
— ANI (@ANI) September 22, 2020
लोकसभेत हे विधेयक गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सादर केलं. जम्मू काश्मीरमध्ये उर्दू बोलणारे केवळ ०.१६ टक्के लोक आहेत. परंतु गेल्या ७० वर्षांपासून हीच इथली अधिकृत भाषा बनली होती. आम्ही जी भाषा बोलतो, त्या भाषांनाही अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा अशी इथल्या लोकांची मागणी होती, असं त्यांनी विधेयक सादर करताना म्हटलं. जम्मू काश्मीरमध्ये ५३.२६ टक्के लोक काश्मिरी भाषा बोलतात. तर २६.६४ टक्के लोक डोगरी भाषेत संवाद साधतात. केंद्र शासित प्रदेशात २.३६ टक्के लोक हिंदी बोलतात, असंही रेड्डी यांनी संसदेत म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.