औरंगाबाद – पंकजा मुंडेंचा दसरा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी एका कारणामुळे चर्चेत असतो. अर्थातच हे कारण राजकीय जास्त असतं. त्यामुळे चर्चा तर होणारच. आजचा दसरा काय खास असेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहेच. त्यातही केंद्रीय मंत्री झालेले आणि कधी काळी दसऱ्याचं स्टेज सांभाळणारे भागवत कराड हजेरी लावणार की नाही याची चर्चा सुरु होती. त्यातच काही दिवसांपूर्वी, आता मी केंद्रीय मंत्री झालोय, त्यामुळे बघावं लागेल असं म्हणून कराडांनी कहानीत ट्विस्ट आणलेला होता.
पंकजा मुंडेंसोबतच्या त्यांच्या मतभेद-नाराजीच्या पार्श्वभूमीवर कराडांच्या वक्तव्यानं जास्तच उत्सुकता निर्माण केली. पण शेवटी भागवत कराड हे सावरगावच्या भगवान भक्तीगडावर येणार असल्याचं स्पष्ट झालंय. ते औरंगाबादहून परळीला येतील. गोपीनाथगडावरून ते हेलिकॉप्टरनं पंकजांसोबत सावरगावच्या दसरा मेळाव्याला पोहोचत आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळाव्याची प्रथा सुरु केली. तेव्हा भागवत कराड हे सामान्य कार्यकर्ता होते. तेव्हा संपूर्ण दसरा मेळाव्याचे नियोजन, स्टेजची तयारी, कार्यकर्त्यांचे नियोजन ही सर्व व्यवस्था भागवत कराड यांनी सांभाळली होती. आता मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवल्यावर डॉ. कराड हे स्वतः दसरा मेळाव्याच्या व्यासपीठाची शोभा वाढवणार आहेत. पंकजा मुंडेंप्रमाणेच डॉ. भागवत कराडदेखील या भाषणात काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.