हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून वारंवार टीका केली जात आहे. तर भाजपचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच मुंबईत जन आशिर्वाद यात्रा काढत शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान त्यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आज मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री असून ते आता शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांनी होकार दिला तर त्यांना तत्काळ आमच्यात घेऊ,” असे राणेंनी म्हंटले आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे गेल्या तीन दिवसांपासून जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधत आहेत. दरम्यान मंत्री राणेंनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असेही राणेंनी यावेळी म्हंटले आहे.
मंत्री राणेंनी मुंबईतील जनअशीर्वाद यात्रेतून ठाकरे सरकारवर जहरी टीकाही केली होती. हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचेही राणेंनी म्हंटले होते. दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषदेत मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.