पुणे प्रतिनिधी | जन्मो जन्मी हाच पती मिळण्यासाठी कामना करण्याची हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे. जेष्ठ पौर्णिमेदिवशी सावित्रीचा पती सत्यवानाचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमाकडून सावित्रीने पतीचे प्राण माघारी आणले त्या दिवशीपासून वट पौर्णिमा सण साजरा केला जाऊ लागला अशी अख्यायिका आहे. मात्र पुण्याच्या पुरुषांनी जन्मो जन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून कामना केली आहे.
मानवी हक्क संरक्षणच्या वतीने ‘हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे.पिंपरी-चिंचवडच्या नवी सांगवी परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला आहे. हा उपक्रम मागील चार वर्षांपासून राबवण्यात येतो आहे. श्रीकांत जोगदंड हे, हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पुरुषांनी वडाच्या झाडाला धागा गुंडाळून उजवा हात पुढे करून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी कामना केली आहे. तसेच पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना देखील केली आहे. या उपक्रमाचे महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. कायद्यात आणि कागदावर असणारी स्त्री पुरुष समानता अशा माध्यमातून समोर आल्यावर त्याचे अप्रुग वाटणे साहजिक आहे.