औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षेची तयारी सुरू केली असून, 1 जून पासून पदवी तर 21 जून पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा ऑफलाइन अर्थात केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य शासनाने कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये आता ऑफलाईन परीक्षा घेण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नुकतेच परीक्षा विभागाला ऑफलाईन परीक्षेचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सोमवारी विद्यापीठात परीक्षा मंडळाची बैठक झाली. या बैठकीत परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. या बैठकीत ऑफलाइन परीक्षेसंबंधी पुढील कार्यवाही करण्यासंबंधी चर्चा झाली. परीक्षा विभागाकडून ऑफलाइन परीक्षा कामाचा आढावा घेण्यात आला. परीक्षेचे वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आले असून, 1 जून पासून पदवी तर 21 जून पासून पदव्युत्तर परीक्षा घेण्याचे ठरले आहे.