फलटण | तालुक्यातील विकासनगर- जिंती येथील एक तरुण कपडे घेऊन रणवरेवस्ती जिंती येथून मित्रासह परत येत असताना 2 अज्ञात व्यक्तींनी एकाला त्याच्याच मोटार सायकलवरुन पळवून नेले. नंतर त्याचा अज्ञातांकडून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खुशी शकील शेख (वय- 22 रा. विकासनगर, जिंती ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवार दि. 16 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान आपण घरी असताना माझे पती शकील अकबर शेख (वय- 21 रा. विकासनगर जिंती ता. फलटण) व त्यांचा मित्र विकास रघुनाथ आवटे (रा. माडकरमळा, साखरवाडी, हल्ली जिंती ता. फलटण) असे दोघेजण आमची काळ्या रंगांची बजाज मोटार सायकल क्रमांक (एमएच-11 एस- 4434) घेवून गेले होते. माझे पती मागील सीटवर बसून कपडे आणण्यासाठी रणवरेवस्ती येथे दत्तोपंत रणवरे यांची खोली भाड्याने घेतली असल्याने तेथे माझे कपडे आणण्यासाठी गेले होते.
त्यानंतर दोन तासांनी म्हणजे 10.15 वाजण्याच्या सुमारास माझ्या पतीचा मित्र विकास रघुनाथ आवटे हा पळत आला. जिंती जनावरांचे दवाखान्याजवळ भेटला व मला म्हणाला, शकील कपडे घेवून गाडीवर बसला होता. मी दाराला कुलुप लावत होतो त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी शकीलला मधल्या सीटवर बसवून कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी शकील शेख याला पळवून नेले असे सांगितले. त्यानंतर मी जिंती येथून रणवरेवस्ती येथे आले. येताना मी माझे दीर यांना मोबाईल फोनद्वारे माहिती दिली असता मोटार सायकलवर रणवरेवस्ती येथे आले. तेथे झालेला प्रकार मी दीराला सांगितला.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये अपहरित व्यक्तीचा शोध घेत असताना पोलीसांना होळ (ता. फलटण) गावचे हद्दीत आपटे यांचे शेतामध्ये अपहरित शकील अकबर शेख हा मयत अवस्थेत आढळून आला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख अधिक तपास करीत आहेत.