हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरात चोरींच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. रात्रीस दिवसाही चोरट्यांकडून चोरी केली जात असून यामध्ये म्हला चोरांचाही सहभाग आहे. असाच चोरीचा प्रकार साताऱ्यातील राजवाडा बसस्थानकात घडला आहे. येथील बस्थानकात शेजारी बसलेल्या अनोळखी महिलांनी वृद्धाची 20 हजारांची रोख रक्कम लंपास केली असून या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यातील राजवाडा बसस्थानक येथे चोरीप्रकरणी माऊली महादेव गायकवाड (रा. आसनगाव कुमठे, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार दि. 14 मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चोरीचा हा प्रकार घडला. राजवाडा बसस्थानकात माऊली गायकवाड बसले होते. यावेळी त्या ठिकाणी दोन अनोळखी महिला येऊन बसल्या. या महिलांनी माऊली यांच्याकडे असलेल्या काळ्या पिशवीतून 20 हजारांची रक्कम काढून नेली.
काही वेळेनंतर माउली गायकवाड यांनी आपल्या पिशवीत असलेली रक्कम बघितली असता ती नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. गायकवाड यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून हि चोरीची घटना राजवाडा बसस्थानक परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर अनोळखी महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चाेरी करणाऱ्या महिलांचा शोध घेत आहेत.