मुंबई । भारतात केंद्र सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलली असून लॉकडाउनची निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. भारतात लॉकडाउन शिथिल केल्यामुळे करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) आरोग्य आपात्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मिशेल रेयान यांनी ही शक्यता वर्तवली. रेयान यांनी सांगितले की, भारतातील विविध भागात महासाथीच्या आजाराचा प्रभाव वेगवेगळा आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील परिस्थितीत फरक आहे. दक्षिण आशियात भारतासह पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही परिस्थिती अद्याप स्फोटक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
महासाथीच्या काळात आजार लोकांमध्ये पसरल्यानंतर कोणत्याही क्षणी अधिक व्यापकपणे फैलावण्याचा धोका असतो. याआधीदेखील अशाच प्रकारे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. भारतात लॉकडाउनमुळे संसर्ग फैलावण्याचा वेग मंदावला आहे.
मात्र, त्यात आता शिथिलता देण्यात येणार असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, शहरात लोकसंख्येची अधिक घनता असणे, हातावर पोट असणाऱ्यांना दररोज कामावर जाण्याशिवाय पर्याय नसणे आदी काही गोष्टींमुळे संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचे रेयान यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”