हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात गुलाबी थंडीचे वातावरण असताना पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्गात देखील रिमझिम सरी बरसात आहेत. अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सोमवारी पहाटे सकाळपासून कोकण आणि सिंधुदुर्ग भागात पाऊस बरसात असल्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. तसेच, आंबा आणि काजु पिकाला आलेला मोहोर गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या पिकांची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तर, नुकत्याच लागवडीला लागलेल्या पिकांना जास्त जपावे लागणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तास कोकणासह अनेक विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच 9 जानेवारीपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाच्या सरी बसू शकतात. सध्या पिकांच्या लागवडीच्या काळात हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या काही तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात मुसळधार पाऊस पहायला मिळाला आहे.
दरम्यान, आज पुणे शहरामध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवस देखील पाऊस हजेरी लावल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना थंडीबरोबर पावसाचा देखील सामना करावा लागणार आहे.