पावसात सुद्धा ड्युटी बजावणाऱ्या पुणे पोलिसांचा ‘तो’ व्हिडिओ पाहून महापौर भारावले, ठोकला कडक सेल्युट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार काल शुक्रवारी दुपारी चारच्या दरम्यान वादळी पावसाने पुणे शहराला झोडपले. सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात झाडे पडली तर काही ठिकाणी मोबाइल टॉवर, दिशादर्शक फलक कोसळले. उपनगरांमध्ये रस्त्यावर पाणीही साठले होते. लॉकडाऊनमुळे लोक घरात असल्याने जीवितहानी टळली. मात्र याच लोकडाऊनमध्ये पुणे शहर पोलीस भर मुसळधार पावसात सुद्धा कर्तव्य बजावत होते. कालच्या मुसळधार पावसामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात रस्त्यावर आपली ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांचीही मोठी तारांबळ उडाली. पण तरी सुद्धा पोलीस आपल्या ड्युटीच्या जागेवरून ते हलले नाही. विश्रामबागवाड्यासमोरील रस्त्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो.

शहरातील विश्रामबागवाडा रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली असून कर्तव्यावर असताना थोडावेळ सावली मिळावी, आराम करता यावा यासाठी त्यांनी रस्त्याच्या बाजूला तात्पुरत्या तंबूची व्यवस्था केली आहे. पण वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पोलिसांचा हा तात्पुरता निवाराही उडून जात होता. मात्र तेथील पोलिसांनी मोठी कसरत करत १०-१५ मिनिटे मुसळधार पावसामध्ये उभे राहून तंबू कसाबसा धरुन ठेवला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना सलाम ठोकला असून ते बजावत असलेल्या कार्याचं कौतुक केलं.

सदर व्हिडिओ ट्विटरवर पुणे पोलिसांना टॅग करत, “सलाम… कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या घटकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. मात्र ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता हे योद्धे लढत राहतात. आजच्या पावसात विश्रामबागवाड्यासमोर दिसलेलं हे चित्र याचीच साक्ष देते”, असे ट्विट महापौरांनी केले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या ट्विटला पुणे पोलिस आयुक्तां डॉ. वेंकटेशम यांनीही रिप्लाय दिला आणि त्यांचे कौतुकासाठी आभार मानले. ‘तुमची साथ असेल तर भविष्यातही आमचे कार्य असेच सुरू राहील’, अशा आशयाचे ट्विट पुणे पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरीही पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”