मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराजवाड्यातील काही भागात गारपीट व अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. आज लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घरणी, आष्टा शिवारात पहाटे साडेचार वाजता अचानकपणे जोरदार वारे वाहू लागले. यावेळी सुमारे अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला तर काही वेळातच गारा ही पडल्या. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील अनेक शेतकऱ्यांची उभी ज्वारी भुईसपाट झाली असून, गारपीटीमुळे गहू, हरभरा या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ आणि परिसरात सोमवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला आहे. मंगळवारी पहाटे येथे पंधरा मिनिटे पावसाची भुरभुरी होती. मात्र या परिसरातील घरणी, घारोळा, मोहनाळ, लातूर रोड, कडमुळी, मोहदळ, अंबुलगा, आष्टा, आष्टामोड येथे जोरदार वाऱ्यासह सुमारे अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी पाच ते दहा मिनिटे जबरदस्त गारपीट झाल्याने घरणी शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील शेतात उभी असलेली ज्वारी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे.

दरम्यान, जोरदार वारे आणि अवकाळी पावसासोबतच गारपीट झाल्यामुळे घरणी, लातूर रोड आणि आष्टामोड शिवारात काढणीला आलेली तुर तसेच गहू, हरभरा, करडई, सुर्यफूल आणि टोमॅटोसह इतर भाजीपाल्यांचेही नुकसान झाल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. या गारपीटग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment