औरंगाबाद – मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील वातावरणात बदल झाला असून अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना विशेषतः हरभरा या पिकांना फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर काल सायंकाळी शहरातही पावसाचा शिडकावा झाला. तसेच औरंगाबादसह मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज, माजलगाव या परिसरातही कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तुळजापूर तालुक्यातही पाऊस पडला आहे. तसेच हिंगोली शहरातील काही भागात देखील पाऊस पडला आहे.
पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा –
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तामिळनाडू जवळ सरकत आहे तर अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र वायव्य कडे सरकत आहे यामुळे राज्यात पुढचे दोन दिवस पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.