प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची उपलब्धता करून दिली जाते. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये 2030 सदनिकांच्या विक्रीची सोडत जाहीर करण्यात आली आहे.
या लॉटरीसाठी तुम्ही अर्ज भरला असेल. तर थोडं इकडे लक्ष द्या. यावेळी लकी ड्रॉ लॉटरीसाठी म्हाडाकडे एक लाख 34 हजार 350 अर्ज आले आहेत. असं असलं तरी केवळ एक लाख 13 हजार 811 अर्जदारांनी सिक्युरिटी डिपॉझिट भरले आहे. म्हाडाकडे सध्या पाच कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.
9 ऑगस्ट पासून म्हाडाची या लॉटरी साठीची अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 पर्यंत अर्ज करता येत होते. घरांची तात्पुरती यादी आज संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट https://housing.mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर 29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत कोणतीही हरकत किंवा दावा ऑनलाईन नोंदवल्या जाणार आहेत
कधी होणार अंतिम यादी जाहीर ?
तुम्हाला सुद्धा म्हाडाच्या अंतिम यादी ची प्रतीक्षा असेल तर हे लक्षात घ्या की तात्पुरती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर स्वीकृत अर्जाची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी सहा वाजता वेबसाईटवर यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नरिमन पॉईंट मुंबई इथे यशवंतराव चव्हाण सेंटर इथे लॉटरी निघणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई विभागीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे