नवी दिल्ली । यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात आली आहे. ३ मे रोजी संपणारा देशातला लॉकडाऊन कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आणि त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केला. ३१ मे रोजी ही परीक्षा पार पडणार होती. ४ मे रोजी लॉकडाउनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निर्बंध लक्षात घेता परीक्षा आणि मुलाखती घेणं शक्य नसल्याचा निष्कर्ष काढत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे.
यूपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चं आयोजन आता ३१ मे रोजी होणार नाही. २० मे रोजी देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर यथावकाश पुढील तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवी तारीख जाहीर करताना उमेदवारांना किमान ३० दिवस अगोदर कळवण्यात येईल. त्यानुसार परीक्षेची नवी तारीख वेसबाइटवर जाहीर करण्यात येईल असं परिपत्रकात म्हटलं आहे.
Civil Services (Preliminary) Examination 2020 scheduled to be held on May 31 has been deferred. New dates will be announced after a review of the situation on May 20: Union Public Service Commission #COVIDー19 pic.twitter.com/K9LKdbGsSC
— ANI (@ANI) May 4, 2020
उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरूच ठेवावी. लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे. यूपीएससी सिव्हील सर्व्हिस परीक्षेसाठी गेली ६ वर्षे विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घ्यावा, उजळणी करावी, असंही आयोगाने सांगितलं आहे. यापूर्वी नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या काही मुलाखतींसह चार विविध परीक्षा आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. यात आर्थिक सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एनडीए आणि संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा या २०२० च्या परीक्षांचा समावेश आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”