औरंगाबाद – केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली अर्थात युपीएससी मार्फत उद्या 10 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी औरंगाबाद शहरात 47 उपकेंद्र निश्चित करण्यात आले आहे. युपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी उद्या औरंगाबादेतील केंद्रांवर 14 हजार 504 उमेदवार परीक्षा देतील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ तथा परीक्षा समन्वयक निलेश गटने यांनी दिली.
युपीएससीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल. सदर परीक्षेसाठी एकूण 1 हजार 989 अधिकारी तथा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता उपस्थित राहतील. युपीएससीची ही परीक्षा औरंगाबादेत दोन सत्रात होणार आहे. सकाळी 9.30 ते 11.30 वाजता पहिले सत्र पार पडेल. तर दुपारी 14.30 ते 16.30 या कालावधीत दुसऱ्या सत्रातील परीक्षा पर पडेल. जिल्ह्यातील 47 उपकेंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल.
प्रवेशासाठी कोणते नियम?
– परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, मुळ ओळखपत्र, सॅनिटायझर बॉटल, पारदर्शक पाणी बॉटल एवढेच साहित्य आणण्याची परवानगी आहे. याव्यतिरिक्त कोणतेही साहित्य उमेदवाराला जवळ बाळगू दिले जाणार नाही.
– उमेदवाराला त्यांच्यासोबत डिजिटल डायरी, मायक्रोफोन, ब्लूटूथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षेच्या कक्षात घेऊन जाण्यास मनाई आहे.
– उपरोक्त इलेक्ट्रॉनिक साहित्य आणल्यास उमेदवारांना स्वतःच्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रांच्या आवारात मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. साहित्याची जबाबदारी आयोग घेणार नाही.
– परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाज्याच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारावर फौजदारी व प्रशासकीय कारवाई केली जाईल. तसेच त्यांना आगामी परीक्षांकरिता बंदी घालण्यात येईल.
– परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली येथून आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत