वॉशिंग्टन । कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर अमेरिकेकडून चीनवर संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार कोरोना महामारीच्या प्रसारासाठी चीन जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प जाहीर सभांमधून चीनवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसवरून दोन्ही देशामधील संबंध ताणले असताना अमेरिकेने चीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास ७२ तासांच्या आत बंद करण्याचे फर्मान सोडले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी याची माहिती दिली.
चीन विरोधात टीका करणाऱ्या ट्रम्प प्रशासनानं चीनला थेट ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन्बिन याविषयी बोलताना म्हणाले,”ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्यासंबंधी चीनला मंगळवारी माहिती देण्यात आली. अमेरिकेनं हा चुकीचा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह चीननं केला आहे. नाहीतर चीनही या निर्णयाविरोधात आवश्यक व योग्य पावलं टाकेल,” असा इशारा चीननं अमेरिकेला दिला आहे.
“अमेरिकेकडून हा एकतर्फी आणि चिथावणीखोर पाऊल टाकले जात आहे. जे की एकप्रकारे आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि द्विपक्षीय कराराचं उल्लंघन करणारं आहे. हे चुकीचं पाऊलं असून, यामुळे दोन्ही देशातील संबंध खराब होतील. अमेरिकेच्या निर्णयावर चीनकडून टीका करण्यात आली आहे,” असंही वांग वेन्बिन म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”