हॅलो महारष्ट्र ऑनलाईन : T20 विश्वचषक स्पर्धेत आज सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. बलाढ्य पाकिस्तानच्या संघाला नवख्या अमेरिकेने पराभूत केलं आहे. या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला, यामध्ये पाकिस्तानचा संघ कमी पडला आणि अमेरिकेने नवा इतिहास रचला. मराठमोळा सौरभ नेत्रवाळकर अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सुपर ओव्हर मध्ये टिच्चून गोलंदाजी करत सौरभने पाकिस्तानला रोखल…
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १५९ धावा केल्या, बाबर आझमने ४४ आणि शादाब खानने ४० धावा केल्या. यानंतर प्रत्युत्तरात उतरलेल्या अमेरिकेच्या संघानेही चांगली सुरुवात केली. मोहन्क पटेल, अँडी गॉस, आरोन जोन्स यांनी उपयुक्त फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ पोचवले. शेवटच्या चेंडूवर यूएसएला विजयासाठी 5 धावांची गरज असताना नितीश कुमारने चौकार ठोकल्याने सामना टाय झाला.
यानंतर सुपर ओव्हर मध्ये पुन्हा एकदा अमेरिकेचा संघ प्रथम उतरला. ॲरॉन जोन्स आणि हरमीत सिंह या जोडीने सुपर ओव्हरमध्ये 18 धावा केल्या, समोर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज मोहम्म्मद अमीर होता, मात्र त्याने या ओव्हर मध्ये तब्बल ३ वाईड बॉल टाकले. त्यामुळे अमेरिकेने आव्हानात्मक धावा केल्या. यानंतर १९ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेला पाकिस्तानचा संघ १३ धावाच करू शकला. मराठमोळ्या सौरभ नेत्रवाळकरने टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर मोठी नामुष्की ओढवली आहे.