हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जमैकाचा प्रसिद्ध खेळाडू 8 वेळा सुवर्णपदक विजेता उसेन बोल्ट यांच्याबाबत वाईट बातमी आहे. नेहमीच नवनवे विक्रम केल्याने व खेळातून पैसै कमविण्यात जगभरात चर्चेत आलेला उसेन बोल्ट आता कंगाल झाला आहे. त्याची आयुष्यभराची कमाई आणि निवृत्तीचे पैसे अचानक गायब झाले. उसेन बोल्टची 12.8 मिलियन डॉलरची (सुमारे 98 कोटी रुपये) फसवणूक झाली आहे.
उसेन बोल्टचे खाते एसएसएल (स्टॉक्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड) कंपनीत होते. ही जमैकन गुंतवणूक कंपनी आहे. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने एका पत्राचा हवाला देत या प्रकरणाची माहिती दिली आहे. बोल्टच्या वकिलाने हे पत्र कंपनीला पाठवले असून, त्यात त्याचे पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. बोल्टला 11 जानेवारीला पहिल्यांदा कळले की, त्याचे पैसे गायब झाले आहेत.
बोल्टच्या वकिलांनी कंपनीकडून दहा दिवसांत पैसे परत करावेत, अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी मागणी केली आहे. आता बोल्टकडे फक्त 12,000 डॉलर (सुमारे 10 लाख रुपये) शिल्लक आहेत. त्याच वेळी कंपनीने या प्रकरणात कोणतेही विधान जारी केलेले नाही.