हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘माढा आणि रणजीत निंबाळकर पाडा’ अगदी एखाद्या म्हणीसारखं यमक जुळून यावं असं माढ्याचं राजकारण जुळून आलय…निंबाळकरांना खासदारकीचं तिकीट रिपीट होतं काय…मोहिते पाटील नाराज होतात काय…फडणवीसांनी मनधरणी करून सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील हाती तुतारी घेतात काय…माढ्याच्या जागेवरून सिनेमातल्या घडामोडीसारखं राजकारण क्षणाक्षणाला बदलत होतं. पण चित्रपटात क्लायमॅक्स आला आणि पडद्यावर एक नवा चेहरा फ्रंटला आला तो म्हणजे उत्तमराव जानकर. फडणवीसांनी जानकरांची भेट घेण्यासाठी त्यांना स्पेशल जेट पाठवलं.…फडणवीसांसोबत साधक बाधक चर्चा झाल्यानंतर दोनच दिवसात त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली. आणि अखेर उत्तमराव जानकर हे मोहिते पाटलांच्या तुतारीला साथ देणार, हे कन्फर्म झालं. पण मोहिते पाटील या नावाचा दबदबा पुऱ्या जिल्ह्यात असताना उत्तमराव जानकर या स्थानिक चेहऱ्याला सगळेच पक्ष इतकी व्हॅल्यू का देतायत? जानकर सोबत आल्यानं मोहिते पाटलांचा माढ्यातील विजय पक्का का मानला जातोय? उत्तमराव जानकर यांची खरी ताकद नेमकी काय आहे? पवारांनी फडणवीसांना पुन्हा एकदा कसा खो दिलाय? याच सगळ्या इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं शोधूयात
माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचं तिकीट रिपीट करत भाजपनं आघाडी घेतली. पण त्यानंतर मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न अपयशी ठरले आणि शरद पवारांनी डाव साधला. धैर्यशील मोहितेंनी हाती तुतारी घेतली आणि शरद पवारांनी भाजपला पहिला शह दिला. पण पवारांनी माढ्यात सर्वात मोठी लीड घेतली ती उत्तमराव जानकरांना सोबत घेऊन… माढ्यातून मोहिते पाटील प्लस, रामराजे अशी ताकद असली तरी धनगरांची मोठी ताकद माढ्यात पाहायला मिळते. मोहिते पाटील आणि रामराजे हे मराठा समाजाचं सोशल इंजिनिअरिंग करू शकतात. मात्र धनगर समाजाची एकगठ्ठा मतं कशी मिळवायची? यासाठी दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न झाले. शरद पवारांनी याची सुरुवात करत महादेव जानकरांना माढ्याच्या जागेवरून पाठिंबा जाहीर केला. जानकर आणि शरद पवारांची भेट झाली. पण त्यानंतर जानकर अचानक सागर बंगल्यावर गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढली. त्यांना परभणीतून लढण्याची ऑफर दिली. अन् जानकर महायुतीतच राहिले. यानंतर मोहिते पाटलांना तुतारीच्या चिन्हावर उमेदवारी मिळाली. तेव्हा माढ्यात मराठा विरुद्ध मराठा असं लोकसभा लढतीला स्वरूप आलं…अशा वेळेस निर्णायक मतदान टाकणारा धनगर समाज कुणाच्या बाजूने असणार? हा मोठा प्रश्न होता.
अशा वेळेस नाव समोर आलं ते उत्तमराव जानकर यांचं. जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. विजयसिंह मोहिते पाटलांना विरोध करूनच त्यांचं राजकारण तरलं. माळशिरस तालुक्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर उत्तमराव जानकरांचा होल्ड चांगला आहे. धनगर समाजाच्या या नेतृत्वाखाली अनेक ग्रामपंचायतीचे सरपंचही काम करतायेत. त्यांचा स्वतःचा मुलगा हा वेळापूर गावचा सरपंच आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या विरोधात त्यांचा निसटता पराभव झाला होता. एकूणच गणित मांडलं तर उत्तमराव जानकर यांची स्वतःची लाख दीड लाखाच्या आसपास वोट बँक आहे. त्यामुळे हा जानकर सोबत असणं हे नेहमीच प्लस मध्ये जाणारं होतं. मोहिते पाटलांचं जुनं वैर असल्यानं जानकर हे महायुती सोबत होते. मात्र लोकसभेच्या तिकिटातून पत्ता कट केल्यानं ते नाराज होते. महायुतीकडून सोलापूरचं तिकीट देण्यात येईल, असा शब्दही आपल्याला दिल्याचा आरोप उत्तमराव जानकरांनी केला होता. महायुतीत आपली फसवणूक झाल्यानं उत्तमराव जानकर तुतारी हाती घेतलेल्या मोहिते पाटलांना बळ देऊन काट्याने काटा काढणार, अशी कुणकुण होऊ लागली. अर्थात जानकरांसारखा ग्राउंड मासबेस असणारा नेता तुटणं भाजपला परवडणारं नव्हतं. म्हणूनच फडणवीसंनी आपला प्लॅन बी ऍक्टिव्ह केला…
जानकरांसाठी त्यांनी बारामतीला स्पेशल चार्टर्ड प्लेन पाठवलं. त्यांना नागपुरात चर्चेसाठीही बोलावून घेतलं. जानकर – फडणवीस अशी अनेक तास चर्चाही झाली. चर्चा सकारात्मक झाली असल्याचं सांगत जानकर महायुती सोबतच राहतील, हे फडणवीसांनी पक्कं केलं. जानकर यांना विधानसभा आणि विधान परिषदेचा शब्द देऊन फडणवीसांनी माढ्यात निंबाळकरांसाठी डॅमेज कंट्रोल केलं होतं. पण गेम चेंजर शरद पवार यांनी यात उडी घेतली. उत्तमराव जानकर यांची दोनच दिवसात भेट घेत, त्यांना तुतारी सोबत घेतलं. कित्येक वर्षांचं राजकीय वैर विसरून मोहिते पाटील आणि जानकर या नेत्यांनी कडाडून गळा भेट घेतली. त्यामुळे जानकरांची ताकद आता फायनली मोहिते पाटलांच्या बाजूने लोकसभेवेळेस दिसणार आहे…शरद पवारांनी टाकलेली ही गुगली अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. नंबर एक, उत्तमराव जानकर सोबत आल्याने माढा, सोलापूर आणि बारामतीतील धनगर समाजाची मतं तुतारीच्या बाजूने वळती करून घेता येतील. नंबर दोन, एकट्या माढ्यात मोहिते पाटलांच्या बाजूने दीड सव्वा दीड लाखाचं मतं निवडणुकीआधीच जोडलं गेलं, नंबर तीन, विधानसभेसाठी तुतारीला माळशिरसमधून उमेदवार मिळाला. शरद पवारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्यानं मोहिते पाटील यांचा माढ्यातील विजय जवळपास कन्फर्म समजला जातोय.
मोहिते पाटलांच्या रूपाने मराठा, सुशील कुमार शिंदेंना सोबत घेत दलित आणि जानकरांच्या रूपाने धनगर समाजाला जोडून पवारांनी माढ्यात मोठं सोशल इंजीनियरिंग घडवून आणलय…थोडक्यात काय तर पवारांनी जानकरांच्या बदल्यात जानकरांना पळवून नेत आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात, याची पुन्हा एकदा चुणूक दाखवून दिलीय. बाकी माढ्यातील शरद पवारांच्या या मास्टर स्ट्रोकबद्दल तुम्हाला काय वाटतं? जानकर यांच्या येण्यानं मोहिते पाटलांची खासदारकी कन्फर्म झालीय, असं छातीठोकपणे खरंच सांगता येईल का? तुमचा अभ्यास काय सांगतो? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.