मुंबई प्रतिनिधी | उझबेकिस्तान येथून मुंबईमध्ये वेश्याव्यावसायाकरता मुलींची आयात करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. झरीना नावाची महिला चक्क उझबेकिस्तान मध्ये बसून मुंबई शहरात सेक्स रेकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर एका परदेशी युवतीसाठी ८० हजार रुपये इतकी रक्कम आकारण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार लाल हा बाॅलिवुडमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणुन काम करतो. उझबेकिस्तान या देशाची नागरीक असलेली वेश्या दलाल महिला नामे झरिना ही यापूर्वी मुंबई मध्ये वास्तव्यास असताना तिची ओळख वेश्यादलाल राजेश लाल याच्याशी झाली होती. वेश्यादलाल झरिना ही सध्या उझबेकिस्तान येथे राहत असून ती तेथून राजेश याच्याशी संपर्क करुन मुंबई येथील तारांकित हाॅटेल मध्ये वेश्यागमनाकरिता परदेशी मुली पुरवते व एका मुलीकरता वेश्यागमनासाठी रु ८०,०००/- इतका मोबदला घेत असल्याची माहिती समाजसेवा शाखेस प्राप्त झाली होती.
सदर माहितीच्या अनुषंगाने ३ जानेवारी रोजी पो.नि. संदेश रेवले व पथक यांनी बोगस गिर्हायकाच्या मार्फत वेश्यादलाल राजेशलाल याच्याशी संपर्क साधला. यावेळी झेड लक्झरी रेसिडेंन्सी या चार तारांकित हाॅटेलमध्ये छापा टाकून केलेल्या कारवाईत उझबेकिस्ताम देशाच्या दोन परदेशी मुलींची सुटका करण्यात आली. तसेच दलाल राजेशलाल यास ताब्यात घेण्यात आले.
सदरील कारवाई मा. सह. पोलिस आयुक्त(गुन्हे) संतोष रस्तोगी, मा. पोलिस उपायुक्त श्री राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक वाहतुक प्रतिबंधक कक्ष, समाजसेवा शाखेतर्फे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. झेड लक्झरी रेसिडेंसी हे जुहू परिसरातील नामांकित तारांकित हाॅटेल असून यापूर्वी २३ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसायास बळी पडलेल्या तीन तरुणींची सुटका केली होती.