हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इस्रोचे विद्यमान प्रमुख एस. सोमनाथ (S. Somanath) हे येत्या १४ जानेवारी २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर व्ही. नारायणन (V Narayanan) हे इस्रोचे (ISRO) नवे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. याबाबतची घोषणा आज केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच , नारायणन यांची अंतराळ सचिवपदाचीही नियुक्ती करण्यात आली असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्ही नारायणन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. सध्या ते वलियमाला येथील लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम सेंटरचे (LPSC) संचालक आहेत. ४० वर्षांच्या अनुभवासह नारायणन यांनी रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशन्समध्ये काम केले आहे. नारायणन यांनी १९८४ साली विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातून इस्रोतील त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती.
साउंडिंग रॉकेट्स, ऑगमेटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल यावर त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत काम केले. महत्वाचे म्हणजे, नारायणन यांनी एलपीएससीमध्ये १८३ प्रोपल्शन आणि कंट्रोल सिस्टीम तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह, जीएसएलव्ही एमके III, चंद्रयान २ आणि ३, तसेच आदित्य स्पेसक्राफ्ट यांसारख्या महत्वाकांक्षी मोहिमांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.