औरंगाबाद – सध्या शहरात कोरोना लसीकरण सुरु आहे. त्यात कोविशिल्ड लसीचा वारंवार तुटवडा निर्माण होत आहे. महापालिकेला सोमवारी पाच हजार लसी मिळाल्या होत्या. पण त्या अवघ्या काही तासात संपल्यामुळे मंगळवारी फक्त एका केंद्रावर कोविशिल्ड लस मिळेल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
कोविशिल्ड लसीच्या तुटवड्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम थंडावली आहे. महापालिकेला सोमवारी पाच हजार कोविशिल्ड लसी मिळाल्या होत्या. त्यानुसार ४३ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लस आल्याची माहिती मिळताच नागरिकांची केंद्रावर एकच गर्दी केली. अनेक केंद्रावर रांगा लागल्या होत्या. दिवसभरात चार हजार ७०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
महापालिकेकडे तीनशे लस शिल्लक असल्याने आज मंगळवारी केवळ प्रोझोन मॉल येथील केंद्रावर ड्राईव्ह इन मोहिमेअंतर्गत लसीकरण सुरू राहील. तसेच कोवॅक्सिनच्या साडेपाच हजार लसी शिल्लक आहेत. त्यामुळे मंगळवारी शहरातील क्रांती चौक, राजनगर, एन-४ मधील एमआयटी हॉस्पिटल या तीन केंद्रावर प्रत्येकी ३०० लसी पाठवल्या जाणार असून पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे, असे पाडळकर यांनी नमूद केले आहे.