औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. लसीकरण हा एकच मार्ग नागरिकांना बाधित होण्यापासून वाचवू शकतो. तब्बल औरंगाबाद शहरात चार लाख लसीकरण झाले आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची गती पुन्हा मंदावणार असे दिसत आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी लसींचा पुरवठा न झाल्याने लसीकरण बंद पडले आहे. मात्र आज तरी लस मिळेल या आशेने शहरातील बंद असलेल्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी सकाळी सकाळी गर्दी केली होती.
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी औरंगाबादकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र आता पुन्हा एकदा लसींच्या तुटवड्याचे संकट समोर उभे राहिले आहे. आता महापालिकेकडे केवळ ३०० लस शिल्लक आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास ७७ लसीकरण केंद्र तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. मंगळवारप्रमाणे आज बुधवारी केवळ प्रोझोन मॉल याठिकाणी ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन तर सुरु राहणार आहे. तसेच आजपासून कोवॅक्सिन लसींचे पहिले डोस देखील दिले जाणार आहेत. राजनगर, क्रांती चौक, एमआयटी हॉस्पिटल एन-२ याठिकाणी कोवॅक्सिनचा पहिला डोस आज मिळेल.
महापालिकेने शासनाकडे १ लाख लसींची मागणी केली आहे. मात्र पुरवठा कधी होइल याबाबत काहीही सांगता येणार नाही. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे लसीकरणावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. शनिवारी सुमारे दोन हजार लसी शिल्लक होत्या. रविवारी मनपाला १२ हजार लसींचा साठा मिळाला होता. यामधून सोमवारी १५ हजार ३९६ जणांचे लसीकरण करण्यात आले. मात्र आता केवळ ३०० लसींचा साठा शिल्लक आहे. आज लसींचा साठा आला नाही तर प्रोझोन मॉल याठिकाणी सुरु असलेले लसीकरणही बंद करावे लागेल. २२ जूनपासून शहरात १८ प्लस लसीकरणाला जोरदार सुरुवात झाली. पाचच दिवसात ६० हजार जणांनी लस टोचून घेतली. सर्वच ठिकाणी तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळत होता. मात्र लसींचा पुरवठा होईपर्यंत नागरिकांवर आता ताटकळण्याची वेळ आली आहे.