हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास दहा ते बारा मतदारसंघात लाखांहून अधिकची मतं मिळवून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) आपली ताकद दाखवून दिली होती. यातल्या तब्बल सात ते आठ जागांवर घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे आघाडीच्या हक्काच्या जागा पडल्या होत्या. याचा फायदा अर्थातच भाजपला झाला होता. या गोष्टीमुळे वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा नेहमी आरोप झाला. याचीच खबरदारी घेत भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. अनेक चर्चांची सत्र झाली, बैठका झाल्या पण जागावाटपात योग्य सन्मान न मिळाल्यामुळे आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. 2019 प्रमाणे यंदा वंचितची लाट नसली तरी अनेक मतदारसंघात वंचितचे उमेदवार निवडून येत खासदार होऊ शकतात. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना पाणी पाजत वंचितचे कुठले उमेदवार खासदार बनण्याचे चान्सेस जास्त आहेत? तेच पाहूयात
वंचितनं महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा या आघाडीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास सगळ्यांनाच वाटू लागला. यामागचं प्रमुख कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) मानणारा मोठा जनसमुदाय. दलित, अल्पसंख्यांक आणि मुस्लिम समाज ही वंचितची ताकद आहे. पाहायला गेलं तर हा तसा पूर्वीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी राहणारा समाज घटक… पण वंचितनं एक नवा पर्याय दिल्यापासून हे व्होट ट्रान्सफर काँग्रेसकडून वंचितकडे झालं… याचाच मोठा फटका काँग्रेसला 2019 मध्ये बसला. जवळपास दहा ते बारा जागा अशा होत्या की जिथे काँग्रेसने आरामात विजयाचा गुलाल कपाळाला लावला असता. पण वंचितच्या उमेदवारांमुळे झालेल्या मत विभाजनाचा फटका आघाडीच्या उमेदवारांना बसला. म्हणूनच 2024 मध्ये दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ असं होता कामा नये, यासाठी त्यांनी महाविकास आघाडीसोबत तिकीट वाटपाची बोलणी चालू ठेवली. पण बऱ्याच गोष्टींवरून खटके उडाल्याने अखेर आघाडी फिस्कटली. आणि वंचितला स्वतंत्र उमेदवारी द्यावी लागली. यातही काही जागांवर मतदानानंतर वंचितच्या उमेदवारांच्या विजयाचे चान्सेस जास्त दिसतायेत…
त्यातला पहिला मतदारसंघ आहे अकोल्याचा…
अकोल्याची लढत वंचित फॅक्टरमुळे इंटरेस्टिंग राहिली. भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर मैदानात असल्याने अकोल्यात खासदारकीसाठी काटे की टक्कर पाहायला मिळाली. गेल्या वेळेस आंबेडकरांनी अकोल्यातून दोन नंबरची मतं घेतली होती. तर काँग्रेस तीन नंबरला फेकला गेला होता. यावेळेस विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे याला लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि जिल्ह्याच्या राजकारणात वैद्यकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील वजनामुळे अभय पाटील हे धोत्रेंच्या विरोधात मैदानात होते. आंबेडकरांच्या पाठीशी असणारा अडीच ते तीन लाख हक्काचा मतदार असल्याने आंबेडकर निवडणूक जिंकले नसले तरी भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यात त्यांनी वळती करून घेतलेली मतं निर्णायक ठरली. यंदा मात्र वंचितनं काहीही झालं तरी आंबेडकरांना दिल्लीत पाठवायचंच यासाठी अकोल्यात फिल्डिंग लावली होती. त्यात विरोधातले दोन्ही उमेदवार हे मराठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरील मत विभाजनाचा फटका हा आंबेडकरांच्या पथ्यावर बसू शकतो. त्यामुळे भाजपची दोन टर्मची खासदारकी मोडीत काढत प्रकाश आंबेडकर इथून खासदार होण्याचे चान्सेस जास्त वाटतायेत.
जा दुसऱ्या मतदारसंघात वंचितच्या जिंकण्याची चान्सेस जास्त आहेत तो मतदारसंघ आहे रामटेकचा…
रामटेक हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ. इथून शिंदे गटाने राजू पारवे तर काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना उमेदवारी देऊ केली होती. पण त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं त्यांच्या ऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर वंचितनं इथून गजभिये यांना पाठिंबा देऊ केलाय. 2019 च्या निवडणुकीत गजभिये यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत भाजपच्या कृपाल तुमाने यांना चांगलाच घाम फोडला होता. मात्र तरीही यंदा त्यांचे तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे नाराज गजभिये यांनी वंचितच्या मदतीने अपक्ष म्हणून लढत दिली. रामटेक मधील दलील, वंचित आणि मुस्लिम समाजाचा वंचितला मोठा पाठिंबा आहे. आंबेडकरांनीही रामटेक मधून गजभियेंच्या पाठीशी मोठी ताकद लावल्यानं दलित समाजाची एकगठ्ठा मतं ही गजभियेंना रेसमध्ये ठेवणारी असल्यामुळे वंचित रामटेकमध्येही चार तारखेला काँग्रेस आणि शिंदे गटाला अनपेक्षित धक्का देऊ शकते…
वंचितचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असणारा तिसरा मतदारसंघ म्हणजे शिर्डी…
शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात दुहेरी लढत होणार याची चर्चा असताना वंचितने इथून मोठा गेम खेळला. मूळच्या काँग्रेसमध्ये असलेल्या उत्कर्षा रूपवते यांचा पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना शिर्डीची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हा मतदारसंघ जिंकण्यासाठी अटीतटीचा बनला. तसं कागदावर बघायला गेलं तर वंचितची शिर्डी मतदारसंघातील ताकद तशी कमी आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला सुटल्यामुळे इथला नाराज काँग्रेसी मतदार हा उत्कर्षा रूपवते यांच्या पाठीशी उभा राहिला असावा. दलित समाज प्लस, वंचितचा कोअर मतदार, काँग्रेसी मतं आणि रूपवते यांची वैयक्तिक लागलेली ताकद अशी सगळी गोळाबेरीज करून पाहिली तर वंचित शिर्डी मधून निवडणूक जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत…
यात आणखीन एक इंटरेस्टिंग लढत होती ती पुण्याची…
तसं बघायला गेलं तर पुण्यातील मुख्य लढत ही मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी असली तरी वसंत मोरे यांच्या उमेदवारीने या निवडणुकीला नवा रंग आला. वंचितचा हक्काचा मतदार आणि वसंत मोरे यांची ताकद जास्त असली तरी दोघांना पिछाडीवर सोडत जिंकून येईल इतका जनाधार मोरेंच्या मागे नव्हता. मात्र पुण्यातील लढत फक्त दुहेरीच होऊ नये यासाठी त्यांनी पुरेपूर काळजी घेतल्याचं मतदानाच्या दिवशी आढळून आलं. मोरे पुण्यात सरशी करणार नसले तरी वंचितला पडणारी मतं ही पुण्यात निर्णायक ठरतील, असेही बोललं जातंय…
हातकणंगले मध्येही 2019 मध्ये वंचितने भल्याभल्यांना घाम फोडला होता. यासाठी 2024 साठी त्यांनी डीसी पाटील यांच्यावर विश्वास ठेवत हातकणंगलेची उमेदवारी देऊ केली. पण इथल्या लढतीला चौरंगी स्वरूप आल्यानं इथून मुख्य प्रादेशिक पक्षांवरच सर्वांचा फोकस राहिला…स्वाभिमानी कडून राजू शेट्टी, शिंदे गटाकडून धैर्यशील माने, ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील या तीन मातब्बरांच्या उमेदवारीने वंचितला मतदारसंघात प्रचाराला जास्त स्कोप मिळाला नाही. पण इथेही वंचित प्रभावी वोट शेयर आपल्याकडे खेचून आणेल, असा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत…तर हे होते असे काही मतदारसंघ जिथे वंचित निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने स्ट्रॉंग वाटतेय. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात वंचित किती आणि कोणत्या जागांवरून निवडून येईल? तुमचा अंदाज कमेंट करून नक्की सांगा.