हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा विकास झाला आहे. देशातील अनेक मार्गावर नवनवीन रेल्वे धावत आहेत. खास करून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या (Vande Bharat Express) संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास अनुभवता येत असल्याने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची मागणीही वाढतच चालली आहे. सध्या महाराष्ट्रात १२ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता राज्याला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. हि ट्रेन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची कनेक्टिव्हीटी वाढवेल.
कसा असेल वंदे भारत एक्सप्रेसचा रूट ?
आम्ही तुम्हाला ज्या वंदे भारत एक्सप्रेस बद्दल सांगतोय ती आहे पुणे ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस. पुण्याला मिळणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन राहणार आहे. ही प्रस्तावित वंदे भारत डिसेंबर 2025 अखेर किंवा जानेवारी 2026 मध्ये प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे ते नांदेड हे अंतर 550 किलोमीटर इतके आहे. सध्या या मार्गावर ज्या एक्सप्रेस ट्रेन सुरु आहेत त्या गाडीने जायचं म्हंटल तर १० ते १२ तासांचा वेळ लागतो. परंतु एकदा का हि वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली कि हेच अंतर अवघ्या ७ तासांवर येईल. म्हणजेच काय तर प्रवाशांचा वेळ ३ तासाने वाचेल. या प्रस्तावित वंदे भारत ट्रेनला पुणे, कुर्डूवाडी, धाराशिव आणि नांदेड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असेल. त्यामुळे या शहरातील प्रवाशाना या वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष लाभ होईल यात शंकाच नाही.
तिकीट किती असेल? Vande Bharat Express
पुणे ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटांची किंमत अधिकृतपणे जाहीर झाली नसली तरी अंदाजे या ट्रेनचे तिकीट दर हे साधारणतः 1200 रुपयांपासून सुरू होईल आणि जास्तीत जास्त 2500 रुपयांपर्यंत जाऊ शकते असे बोललं जातंय.
सध्या महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस
सध्या महाराष्ट्रात १२ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express) धावत आहेत. यामध्ये मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, CSMT ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते पुणे, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या गाड्यांचा समावेश आहे.




