हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vande Bharat Express । महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. तसेच वंदे भारत रेल्वेगाड्यांची संख्याही जास्त आहे. राज्यात सध्या मुंबई सेंट्रल–अहमदाबाद, सीएसएमटी–सोलापूर, सीएसएमटी–शिर्डी, मुंबई सेंट्रल–गांधीनगर, सीएसएमटी–मडगाव, पुणे–कोल्हापूर, पुणे–हुबळी, नागपूर–सिकंदराबाद, नागपूर–इंदूर आणि नागपूर–बिलासपूर अशा विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. यातील एका वंदे भारत एक्सप्रेसला आणखी एक थांबा मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.
कोणत्या वंदे भारतला अतिरिक्त थांबा – Vande Bharat Express
आम्ही तुम्हाला ज्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) बद्दल सांगतोय ती आहे मुंबई सेंट्रल–गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन…. महाराष्ट्र आणि गुजरात या २ राज्यांना जोडणाऱ्या या ट्रेनला वलसाड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 27 जुलै 2025 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे वलसाड येथील प्रवाशांना फायदा होणार आहे. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं कि, ही वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20901) 28 जुलै 2025 पासून सकाळी 8 वाजून 19 मिनिटांनी वलसाड स्थानकावर दाखल होईल आणि 2 मिनिटांचा थांबा घेऊन पुढील प्रवास सुरू करेल. वलसाडला मिळालेल्या या नव्या थांब्यामुळे अहमदाबाद, आनंद, वडोदरा आणि सुरत या स्थानकांच्या वेळापत्रकात सुद्धा बदल होणार आहे.
कस असेल नवीन वेळापत्रक-
नव्या वेळापत्रकानुसार, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai Central To Gandhinagar Vande Bharat Express) मुंबईहून सकाळी 6 वाजता प्रस्थान करेल. त्यानंतर हि ट्रेन 6:23 वाजता बोरिवली, 7:56 वाजता वापी, 8:19 वाजता वलसाड, 9 वाजता सुरत, 10:18 वाजता वडोदरा, 10:43 वाजता आनंद, 11:30 वाजता अहमदाबाद आणि दुपारी 12:25 वाजता गांधीनगरला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात हीच ट्रेन दुपारी 2 वाजता गांधीनगरहून रवाना होईल. त्यानंतर ती अहमदाबादला 2:40 वाजता, आनंद येथे 3:25 वाजता, वडोदऱ्याला 3:48 वाजता, सुरतला 5:05 वाजता, वलसाड येथे 5:51 वाजता, वापी येथे 6:13 वाजता, बोरिवलीला 7:32 वाजता पोहोचेल आणि अखेर रात्री 8:30 वाजता मुंबई सेंट्रल स्थानकावर येईल.




