Vande Bharat Express : देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यातही काही अशा ट्रेन्स आहेत ज्या भारतीयांच्या मोठ्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘वंदे भारत एक्सप्रेस’. पूर्णपणे स्वदेशी असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. म्हणूनच या ट्रेनची मागणी देशभरातून होत आहे. महाराष्ट्रातूनही ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला मोठी मागणी आहे. आता महाराष्ट्रातल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. नक्की कोणत्या मार्गावर या गाड्या धावणार आहे चला जाणून घेऊया…
वंदे भारत स्लीपर ट्रेन
महाराष्ट्राच्या बाबतील बोलायचे झाल्यास सध्या ८ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. आता त्यामध्ये आणखी दोन वंदे भारत ट्रेन्सची भर पडणार आहे. एवढेच नाही तर नव्या मिळणाऱ्या वंदे भारत ट्रेन्सपैकी एक ही ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन असू शकते. ही गाडी मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी सुद्धा ही आनंदाची बाब आहे.
कोल्हापूरला मिळणार वंदे भारत ?
कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात यावी अशी मागणी मागच्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कोल्हापुरात प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे आश्वासन दिले होते. यानंतर तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर लोकसभा निवडणुकीनंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे अशी माहिती दिली होती.
खासदार मुन्ना महाडिक यांनी सुद्धा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देऊन कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे लवकरच या मार्गावर नवीन वंदे भारत ट्रेन सुरु होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.