हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनसेला रामराम ठोकत पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे (Vasant More) लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच त्यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची मुंबईत जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतील, असे देखील सांगितले जात आहे. परंतु अद्याप या दोन्ही नेत्यांमध्ये नेमके कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे समोर आलेले नाही
महत्वाचे म्हणजे, वसंत मोरे लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातून उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पुणे मतदारसंघातून तिकीट दिले जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण की, शुक्रवारी स्वतः वसंत मोरे यांनी मुंबईत जाऊन राजगृहावर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दोन ते तीन तास चर्चा झाली. पुढे ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती देखील वसंत मोरे यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मला प्रकाश आंबेडकर यांनी बोलावलं हे माझं नशिब, मला वेळ दिला या वेळेत चांगली चर्चा झाली. येत्या 2-3 दिवसात पुढे चर्चा होतील. अजून लोकसभेची चौथ्या टप्प्यातील निवडणूक लांब आहे. सध्या फक्त सकारात्मक चर्चा झाली. पुढची वाटचाल कशी असेल ते लवकरच समजेल. पक्षप्रवेशाबाबत भविष्यात साहेब निर्णय घेतील. याबाबत भूमिका ते जाहीर करतील. त्याचं फलित लोकसभेचा खासदार या विचारातून होईल याची खात्री आहे”
नव्या राजकारणाविषयी प्रकाश आंबेडकरांचे संकेत
त्याचबरोबर या चर्चेविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, “आमची वसंत मोरेंशी चर्चा झाली आहे. पण महत्त्वाची चर्चा अद्याप बाकी आहे. 31 तारखेपर्यंत यासंबंधी अधिकृत माहिती दिली जाईल. नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण करणार आहेत याबद्दल तेव्हा सांगण्यात येईल. काही चर्चा मी उघड करु शकत नाही. घटना अजून घडत असताना त्यावर बोलणं योग्य नाही. 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्रातील समीकरण, चित्र स्पष्ट होईल”