हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. यात जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या वारंवार बैठका पार पडताना दिसत आहेत. बुधवारी देखील महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने, मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बुधवारी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आघाडीला हा प्रस्ताव दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. पुंडकर म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या बैठकीत ज्या दिवशी शरद पवार, उद्धव ठाकरे असतील, तेव्हा प्रकाश आंबेडकर असतील. आज आम्ही बैठकीत प्रस्ताव दिला आहे. आम्ही 4 मागण्या मांडल्या. यात जालन्यातून मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी. तर पुण्यातून अभिजीत वैद्य यांना अधिकृत उमेदवार घोषित करावे ही प्रमूख मागणी आहे.”
त्याचबरोबर, “आम्ही मागच्या जून-जुलैमध्ये लक्ष केंद्रीत केलेल्या मतदारसंघाची यादी तयार केली होती. ती यादी आम्ही महाविकास आघाडीला दिली आहे. या जागांपैकी काही जागांवर अपवाद सोडून इतर जागांवर आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चा करायला तयार आहोत” असे देखील डॉ. धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले.
वंचित आघाडीचा प्रस्ताव काय?
1) आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील तर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य उमेदवार घोषित करावे.
2) महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत 15 ओबीसी उमेदवार असावेत.
3) आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने लेखी वचन दिले पाहिजे की, पुढे जाऊन पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही.
4) लोकसभेच्या निवडणुकीत किमान 03 अल्पसंख्यांक उमेदवार असावेत.