गाड्यांचा लिलाव : कराड शहर पोलिसांना मिळाले पावणेपाच लाख रूपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी गाड्यांच्या लिलावातून दोन तासात पोलिसांना चक्क 4 लाख 73 हजार 500 रूपयांची रक्कम मिळाली आहे. शहर व परिसरातून विविध ठिकाणाहून बेवारस स्थितीत आढळून आलेल्या तसेच सूचना करून ही ताब्यात न घेतलेल्या सुमारे 35 दुचाकी गाड्यांसह एका मारुती कारचा लिलाव घेण्यात आला. या लिलावाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहर पोलीस स्टेशनच्या आवारात हा लिलाव घेण्यात आला.

गेल्या काही वर्षात विविध कारणास्तव मिळालेल्या 35 दुचाकी व मारुती कार अशा 36 वाहनांच्या लिलावा बाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लिलाव घेण्यात आला. या लिलावातून 4 लाख 73 हजार 500 रूपयांची रक्कम जमा झाली. सदरची रक्कम पोलीस वेल्फेअर फंडात जाणार असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. आरटीओ विभागाने सदर वाहनांच्या किमंती निश्चित केल्या होत्या. लिलावात किमतीच्या तिप्पट रक्कम मिळाली आहे. अनेक दूचाकी या सूस्थितीत असल्याने लिलावात या दूचाकीसाठी 50 हजारापर्यंत बोली लागली होती.

दरम्यान शहर पोलीस स्टेशनच्या आवारात विविध गुन्ह्यातील व अपघातातील शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. पोलीस स्टेशनच्या आवारातील जागा या वाहनांनी व्यापली असून अनेक वाहने गंजू लागले आहेत. तर अनेक वाहने धूळ खात पडून आहेत. त्यामुळे या आवारात अस्वच्छता निर्माण झाली असून या ठिकाणी स्वच्छता करून शिस्तबद्ध वाहने लावण्याची गरज आहे.