हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Matheran Hill Station) रोजची दगदग, कामाचा ताण, प्रवासाचा थकवा घालवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे रोड ट्रिप. मित्र मैत्रिणी, कुटुंबीय, प्रिय व्यक्तींसोबत एक मस्त रोड ट्रिप प्लॅन केली तर तुमचा ताण तणाव कसा छूमंतर होईल तुमचं तुम्हालाचं कळणार नाही. त्यात स्वतःची गाडी असली कि फिरायला जायची मजा आणखीच वाढते. पण आपल्या महाराष्ट्रात एक असं पर्यटन स्थळ आहे ज्याचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी तुमच्या गाडीला No Entry आहे. होय. तुम्ही अगदी बरोबर वाचलात. No Entry.. हे ठिकाण म्हणजे प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरान.
प्रेमात पाडेल असं माथेरान (Matheran Hill Station)
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटं हिल स्टेशन म्हणून माथेरानची ओळख आहे. पण माथेरान जवळून पहायचं आणि अनुभवायचं असेल तर आपली वाहने दूरवर पार्क करुन चालत हे हिल स्टेशन फिरावं लागतं. महाराष्ट्रचं नव्हे तर परदेशातून देखील अनेक पर्यटक माथेरान एक्स्प्लोर करायला येत असतात.
थंड वातावरण, शुद्ध हवा आणि नयनरम्य दृश्य असं माथेरानचं मनमोहक सौंदर्य कुणालाही प्रेमात पाडेल असं आहे. पावसाळ्यात माथेरानच्या सौंदर्यात आणखीच चार चाँद लागतात. डोंगरांमधून कोसळणारे छोटे छोटे फेसाळलेले धबधबे मनाला प्रफुल्लित करतात.पण हे सगळं सौंदर्य पाहण्यासाठी तुम्हाला वाहनाचा वापर करताना येत नाही.
माथेरान मधील प्रसिद्ध व्ह्यू पॉईंट्स
माथेरानमध्ये अनेक व्ह्यू पॉईंट्स पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. (Matheran Hill Station) यामध्ये इको पॉईंट, लुइसा पॉइंट, चार्लोट झील, मंकी पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, वन ट्री हिल पॉईंट, माथेरान लॉर्ड पॉईंट, माथेरान सनसेट पॉईंट यांचा समावेश आहे. एका दिवसात फिरून होईल इतकं माथेरान छोटं नाही. त्यामुळे अनेक पर्यटक इथे स्टे करताना दिसतात. ज्यासाठी इथे काही लहान मोठे हॉटेल्स आहेत.
माथेरानचा इतिहास
माथेरान या सुंदर हिल स्टेशनचा शोध १९ व्या शतकात लागला. ठाण्याचे जिल्हाधिकारी ह्यू पॉईंटझ मॅलेट यांनी हे पर्यटनस्थळ शोधून काढले. ब्रिटिश सत्ताधिकाऱ्यांना या स्थळाची भुरळ पडली आणि त्यानंतर माथेरानला ‘हिल स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात आले. पुढे १५ एप्रिल १९०७ रोजी याठिकाणी टॉय ट्रेन सुरु झाली. जी इथे येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मात्र, पावसाळ्यात घाटातून दरड कोसळण्याची भिती असल्याने तेव्हढ्या कालावधीसाठी टॉय ट्रेन बंद असते.
वाहनमुक्त पर्यटन स्थळ
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये २६०० फुट उंचीवर वसलेलं माथेरान पर्यटकांना स्वर्गसुख देणारे स्थान आहे. या सुंदर माथेरानात वाहनांना प्रवेश नसल्यामुळे इथे प्रदूषणावर विशेष नियंत्रण आहे. (Matheran Hill Station) हे हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे८०३ मीटर उंचीवर आहे. नेरळचा घाट चढल्यानंतर माथेरानच्या पायथ्याशी वाहने थांबवली जातात. इथून पुढे माथेरानमध्ये प्रवेश करताना एकतर पायी प्रवास करावा लागतो किंवा मग ढकलगाडी वा घोड्यावर बसून माथेरान फिरता येते. माथेरानविषयी खास बाब अशी कि, हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त पर्यटन स्थळ आहे. इथे येणारे पर्यटक हसत हसत पायीच निसर्ग न्याहाळणे पसंत करताना दिसतात.