पाटण | नवारस्ता (ता. पाटण) येथील शिवांजली पतसंस्थेच्या कथित 17 कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा अर्थिक गुन्हे शाखेकडून चेअरमन संस्थापक व व्यवस्थापक यांची स्वमालकीचे चारचाकी दुचाकी असा 40 लाखांचा मुद्देमालावर जप्तीची कारवाई केली. या कारवाईने पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तिनही आरोपी तीन महिन्यापासुन फरार आहेत. उरलेली मालमत्ताही जप्त करणार असल्याचे संकेत अर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिले.
नवारस्ता येथील शिवांजली पतसंस्थेच्या कथित 17 कोटी घोटाळा प्रकरणी सर्व कागदोपत्री तपासातून व सहाय्यक निबंधक सातारा यांच्या अहवालानुसार संस्थेच्या लेखा परिक्षणात आढळलेल्या तपासावरुन या संस्थेत घोटाळा झाला असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संस्थेचे संस्थापक, चेअरमन व संचालकासह 14 जणांवर मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करणेत आला होता. याबाबत चौकशी अंती हे प्रकरण कालांतराने सातारा येथील अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणेत आले. दरम्यानच्या दोन दिवसात अर्थिक गुन्हे शाखेने संस्थेचे, संस्थापक, व्यवस्थापक चेअरमन यांच्या स्वमालकीची चारचाकी 4 व दुचाकी एक असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल आर्थिक गुन्हे शाखेकडुन जप्त करणेत आला आहे.
या कारवाईत एक डंपर (MH- 50- 2271), स्कार्पियो क्र (MH- 11- CJ- 7), महिंद्रा इनव्हेंडर (MH- 11- AK- 0783), आणि कार क्रं (MH- 50- L- 9499) व दुचाकी क्रं. (MH- 50- P- 7918) या पाच गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. सशंयीत आरोपी जयंत देवकर, दादासाहेब माथणे, व्यवस्थापक अभिजित देवकर हे अद्याप फरारच आहेत. अर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक जप्ती कारवाईमुळे सध्या तरी ठेविदारांमध्ये ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.