हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अल्झायमर आजाराला (Alzheimer’s) लढा देण्यासाठी प्रभावी औषधाचा शोध डॉक्टर आणि संशोधक गेल्या अनेक दशकांपासून करत आहेत. मात्र आता काही संशोधकांना या अल्झायमर आजाराचा वियाग्रा औषधाशी (Viagra Drug) संबंध असल्याचे आढळून आले आहे. एका संशोधनामध्ये, “जे पुरूष वियाग्रा हे औषध घेतात त्यांना अल्झायमर रोगाचा धोका कमी होऊ शकतो” अशी मोठी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता वियाग्रा औषधाचा संबंध थेट अल्झायमर रोगाशी जोडण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका संशोधनात आढळून आले आहे की काही पुरुषांना वियाग्रा आणि तत्सम औषधे लिहून देण्यात आली होती. याचं पुरुषांना अल्झायमर हा आजार होण्याची शक्यता 18 टक्के इतकी कमी असल्याचे दिसून आली. परंतु ज्या पुरुषांना वियाग्रा औषध देण्यात आले नाही, त्यांच्यावर याचा कोणताही प्रभाव दिसून आला नाही. या संशोधनासाठी डॉक्टरांनी 260,000 हून अधिक पुरुषांची वैद्यकीय चाचणी केली होती.
मुख्य म्हणजे, अल्झायमर आजारावरील औषधाचा शोध घेण्यासाठी डॉक्टर गेल्या पाच वर्षांपासून हे संशोधन करत होते. या संशोधनामध्ये त्यांना अनेक विविध बाबी आढळून आल्या. त्यांनी संशोधनादरम्यान 260,000 हून अधिक पुरुषांचे निरीक्षण केले आणि त्यांचा अहवाल नोंदवला. या अहवालात हे स्पष्ट झाले की, ज्या पुरुषांना वियाग्रा औषध जास्तीत जास्त वेळा लिहून देण्यात आले, त्यांच्यामध्ये वियाग्राचा प्रभाव सर्वात मजबूत होता.
तसेच, शास्त्रज्ञांना त्यांच्या अभ्यासादरम्यान 21 ते 50 वेळा इरेक्टाइल डिसफंक्शन गोळ्या लिहून दिलेल्या पुरुषांमध्ये अल्झायमरचा धोका 44 टक्क्यांनी कमी असल्याचे आढळून आले. महत्त्वाचे म्हणजे, अद्याप हा निरीक्षणात्मक अभ्यास हे ठरवू शकला नाही की, वियाग्रा आणि तत्सम गोळ्या लोकांना अल्झायमरपासून वाचवू शकतात. त्यामुळे हे सिद्ध करण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
दरम्यान, या संशोधनाविषयी माहिती देताना युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील लेखक डॉ. रुथ ब्राउअर यांनी सांगितले की, “त्यांनी या अभ्यासासाठी 260,000 हून अधिक पुरुषांच्या वैद्यकीय नोंदींचे विश्लेषण केले. यातील काही पुरुष असे होते, ज्यांचे इरेक्टाइल डिसफंक्शनचे निदान झाले होते. तर काहींच्या विचार करण्याच्या समस्या होत्या. यातील निम्म्याहून अधिक पुरुष पीडीई 5 इनहिबिटर ड्रग्स घेत होते.” त्याचबरोबर, “आम्हाला आता या औषधांचा अल्झायमरचा स्त्रियांवर तसेच पुरुषांवर होणारा परिणाम पाहण्यासाठी योग्य क्लिनिकल चाचणीची गरज आहे” अशी माहिती ब्राउअर यांनी दिली.