कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. विषय दिवस समारोह समितीच्या कार्यक्रमात ब्रिगेडीयर जेम्स थॉमस, साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार असून 15 डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कराड येथे आज विजय दिवस समारोहातील कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीचे पदाधिकारी विनायक विभुते, सहसचिव विलासराव जाधव, उद्योजक दिपक अरबुणे, सलिम मुजावर, विजय दिवस समितीचे मीनल ढापरे, चंद्रकांत जाधव , रमेश जाधव, प्रा. बी एस खोत, रत्नाकर शानभाग, परवेझ सुतार, महालिंग मुंढेकर, सतीश उपळाविकर आदी उपस्थित होते.
अॅड मोहिते म्हणाले, कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा रौप्यमहोत्सव विजय दिवस साजरा होत आहे. विजय दिवस समीतीतर्फे दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव यशवंत पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. आत्तापर्यंत जेष्ठ नेते पी. डी. पाटील, संभाजीबाबा थोरात, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले, नाननाथआण्णा नायकवडी यांच्यासह मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षीचा पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे.
15 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात पुरस्काराचे वितरण आणि ब्रिगेडीयर जेम्स थॉमस व पोलिस अधिक्षक समीर शेख यांचा विषेश पुरस्काराने सन्मान होईल. याच कार्यक्रमात वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण, तळबीड (ता. कऱ्हाड), आदर्श माता बाळुताई ढेबे, (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (लाहोटी कन्याप्रशाला कऱ्हाड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (वेणुताई चव्हाण कॉलेज, कऱ्हाड) यांनाही गौरवण्यात येईल.
कर्नल पाटील यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन
15 डिसेंबरला होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ज्यांच्यामुळे कऱ्हाडमध्ये विजय दिवस साजरा होत आहे ते विजय दिवसचे अध्यक्ष कर्नस संभाजीराव पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारीत ग्रंथाचे प्रकाशन होईल. त्यास माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे व मान्यवर उपस्थित राहतील.