विदर्भ पर्यावरण परिषद विशेष | संजय सोनटक्के
एल्गार कँम्पस , चितेगांव ता. मूल, जिल्हा चंद्रपूर येथे 26 वी विदर्भ पर्यावरण परिषद युवाशक्तीच्या सहभाग आणि सहकार्यातून यशस्वीपणे पार पडली. त्यामुळे विदर्भातील पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी उर्जा निर्माण झाली आहे.
26 व्या विदर्भ पर्यावरण परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी ऍड पारोमीता गोस्वामी, त्यांच्या एल्गार प्रतिष्ठान आणि श्रमिक एल्गारने घेतली होती. एल्गार परीसरात 10, 11 आणि 12 जानेवारी 2020 या तीन दिवसात अतिशय गांभीर्याने आणि खेळीमेळीच्या वातावरणात “परिवर्तन, विकास आणि पर्यावरण” ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून चर्चा,मंथन आणि संवाद झाला.
डॉ मिलिंद वाटवे, (पुणे) डॉ सुरेश चोपणे (चंद्रपूर), हरीभाऊजी पाथोडे सर (सिंदवाही), डॉ पूर्वा जोशी (पूणे), प्रा प्रभाकर पुसदकर (वर्धा), डॉ योगेश दुधपचारे (चंद्रपूर), मोहन हिराबाई हिरालाल(चंद्रपूर), प्रा धम्मसंगीनी रमागोरख (नागपूर), अँड पारोमीता गोस्वामी, डॉ. जयश्री कापसे -गावंडे (चंद्रपूर), प्रशांत सावंत (पुणे) इंजी. उदयनजी कावळे (चंद्रपूर) डॉ सतीश गोगुलवार ,डॉ धनंजय सोनटक्के (वर्धा), श्री दिलीप गोडे यांनी परिषदेत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत उपस्थित प्रतिनिधींसोबत संवाद साधला. अतिशय मुक्तपणे वक्ते आणि उपस्थित प्रतिनिधी एकमेकांशी संवाद साधत होते. तज्ञ अभ्यासकांसोबत युवाशक्ती स्वतःला जोडत होती. युवाशक्ती संवादातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढील दिशेचा शोध घेत होती. हे अतिशय आश्वासक चित्र परिषदेत दिसले.
विदर्भ पर्यावरण परिषदेचे आयोजन संंपूर्णपणे लोकसहभागातून होत असते. लोक आपापल्या खर्चाने येतात परिषदेच्या खर्चाचा भार सामूहिकरीत्या उचलला जातो यासाठी कुणीही प्रयोजक नसतो. अतिशय साधेपणाने कुठल्याही प्रकारचा भपकेबाजपणा न करता विदर्भ पर्यावरण परिषदेचा प्रवास सुरु आहे.
वन्यजीव आणि मानवी संघर्ष, शेतीचे होणारे नुकसान यावरील शेतमाल नुकसान भरपाईच्या अनोख्या व्यावहारिक मॉडेलवर डॉ वाटवेंनी मांडणी केली. वनस्पती, वन्यजीव आणि मानवी वर्तन यावर त्यांनी भाष्य केले. शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज त्यांनी मांडली. अभ्यास आणि आंदोलन याचा समन्वय असणे गरजेचे आहे याचा उल्लेखही त्यांनी केला. गोंडवानाची माहिती देत डॉ दूधपचारे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरणीय समस्या आणि परिस्थितीची मांडणी केली. चंद्रपूर मधील जंगल स्थिती, कोळसा खाणी , उद्योग, औष्णिक उर्जा केंद्र आणि संबंधित समस्येची मांडणीही केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या हतबल स्थितीवर देखील त्यांनी भाष्य केले गेले. मोहन हिराबाई हिरालाल यांनी गोंड हा मूळ शब्द नसून कोया म्हणजे माणूस हा शब्दाचा अर्थ सांगत आदिवासींच्या सर्वसहमतीने होणाऱ्या प्रयोगाची माहिती दिली. सद्यस्थितीत व्यवस्था माणसाचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास संपवायला निघाल्याचे निरिक्षण त्यांनी नोंदवले. धम्मसंगीनी यांनी पर्यावरण चळवळीचे स्रीवादी दृष्टीकोनातून अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. साधनसंपत्ती आणि सत्तेतील समान वाटा यावर भाष्य करीत कुणाच्या जीवावर आपला विकास सुरू आहे. विस्थापित आणि वंचित घटकांचे भावविश्व ,स्री पुरुष नातेसंबंध, तसेच पर्यावरण चळवळीचे विश्लेषण त्यांनी मांडले. कुटुंब व्यवस्थेत लोकशाहीचा अभाव असल्याचे मत मांडत ” स्रीवाद ” हे सर्वांच्या मुक्ती चे तत्त्वज्ञान असल्याची मांडणी त्यांनी केली. युनो ही जागतिक पारावर बसलेली म्हातारी मंडळी आहेत. त्यांची फारशी दखल जग घेत नाही.
ऍडव्होकेट गोविंद भेंडारकर यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचा प्रवास मांडला. गोसेखुर्दचा संघर्ष, गोसेखुर्दमधील अडचणी, नागनदीमुळे प्रदूषित होणारा गोसेखुर्द जलाशय आणि त्यांच्या जवळपास 150 गावातील लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा अतिशय गंभीर विषय असल्याचे मत त्यांनी मांडले. सांडपाण्यावर गांभीर्याने पाहिजे तशी प्रक्रिया न करता गोसेखुर्द प्रदूषण वाढते आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे.
डब्ल्यू सी एल चे महाप्रबंधक कावळे साहेबांनी कोळसा खाणी आणि उर्जा याची मांडणी करीत नवीन प्रकारच्या अमर्यादित शाश्वत उर्जा स्रोतांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली. पर्यावरणाचा ऱ्हास घरातून, कुटुंबातून होतोय त्यामुळे पर्यावरण पूरक उद्योग वस्तू निर्माण करीत त्यांचा उपयोग व्हावा अशी मांडणी करीत स्वताचे तत्त्वज्ञान निर्माण करून युवकांनी आपले आयुष्य सक्षम पणे उभारत पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
प्रा. प्रभाकर पुसदकर यांनी परिवर्तन विकास आणि पर्यावरण हि संकल्पना अतिशय अभ्यासपूर्ण मांडत एकंदरीतच जगण्यातील आणि धोरणात्मक व्यवस्थेतील कोरडेपणा यावर भाष्य करीत समाजात आणि धोरणात्मक व्यवस्थेत संवेदनशील असण्याची गरज व्यक्त केली. या सर्व तीन दिवसांत उपस्थित प्रतिनिधींनी गांभीर्याने चर्चा करीत विदर्भात शाश्वत विकासासाठी कार्यरत राहण्यासाठी कटीबद्ध असल्याची भावना व्यक्त केली.
26 व्या विदर्भ पर्यावरण परिषदेत विदर्भातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी, तसेच पुणे तथा दिल्ली येथील प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील 27 वी विदर्भ पर्यावरण परिषद धम्दीटोला ता. देवरी जिल्हा गोंदिया येथे होणार असल्याची सर्वसहमतीने ठरविण्यात आले आणि आयोजनाची जबाबदारी मा. दिलीप भाऊ गोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली. 27 व्या परिषदेत पुन्हा भेटुयात म्हणत विदर्भ पर्यावरण परिषदेच्या पुढील प्रवासास सुरुवात झाली.
लेखन – लोकमित्र संजय सोनटक्के
संपर्क – 9822469495