खटाव | रावण युध्द हरला, तो अंतिम घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले माझ्याकडे ऐवढी सेना असताना तु का जिंकला. रामाने सांगितले तुझा भाऊ बिभीषण माझ्याकडे होते. तेव्हा भाऊ माझ्याकडे नसताना मी जिंकलो कारण रामाची नियत खराब होती, जयकुमारची नियत खराब नव्हती. तर त्यामुळे मी जिंकलो आहे, असं वक्तव्य माण मतदार संघाचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे मोठा गोंधळ उडाला मात्र कार्यकर्त्यांनी चूक लक्षात आणून देताच त्यांनी ती तातडीने दुरुस्तही केली. वडूज (जि. सातारा) नजीक सातेवाडी (ता. खटाव) येथील विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण, रामाची नियत खराब होती, असे जयकुमार गोरे म्हणाले आहेत. सध्या या वक्तव्याचा व्हिडिअो चांगलाच व्हायरल होत आहे.
त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, पिंपरी चिंचवड महानगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राजकारणात सध्या झालेल्या विजयाबद्दल जयकुमार गोरे बोलत होते. ते म्हणाले, लढाईत रामाने रावणाला हरवले. रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी सेना आहे. एवढी ताकद आहे. एवढे राक्षस आहेत. तुझ्याकडे तर फक्त वानरे आहेत. तरीही तू जिंकलास कसा? त्यावर राम म्हणाला, माझ्याकडे तुझा भाऊ बिभीषण होता. म्हणून लढाई जिंकलो, असे स्पष्ट करून आमदार गोरे म्हणाले, माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण, रामाची नियत खराब होती. रामाची नियत खराब होती. आमदार गोरे असे दोन वेळा म्हणताच झालेली चूक श्रोत्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. रामाची नव्हे, रावणाची नियत खराब होती, असा गलका श्रोत्यांनी करताच गोरेंनी रावणाची नियत खराब होती, अशी चुकीची दुरुस्ती केली.