मुंबई । लॉकडाउनमुळे जगभरातील सिनेमा थिएटर बंद आहेत आणि याचा मोठा फटका चित्रपट व्यवसायाला बसत आहे. याचमुळे अनेक हॉलिवूडपटांनी लॉकडाउन उघडण्याची जास्त वेळ वाट न पाहता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे प्रदर्शित करायला सुरुवात केली आहे. भारतात सुद्धा लॉकडाउनमुळे अनेक बॉलिवूडपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहेत. गुलाबो सिताबो सिनेमानंतर विद्या बालन स्टारर ‘शकुंतला देवी’ यांचा बायोपिक चित्रपटगृहात प्रदर्शित न होता अमेझॉन प्राइमवर होणार आहे.
अनु मेनन दिग्दर्शित या सिनेमात विद्या बालनने मानवी कॉम्प्युटर अशी ओळख असलेल्या गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. अगदी काही सेकंदाच्या आत शकुंतला देवी कठिणातलं कठीण गणिताचं उत्तर द्यायच्या. कॉम्प्युटर आणि कॅलक्युलेटरपेक्षा जलदगतीने त्यांचा मेंदू काम करायचा. या सिनेमात विद्या बालनसोबत सान्या मल्होत्राचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सान्या या सिनेमात शकुंतला देवी यांच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या दोघींसोबत अमित साध आणि जिस्शू सेनगुप्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
दरम्यान, हा सिनेमा लवकरच आता अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र किती तारखेला प्रदर्शित होईल याबद्दल अजून सांगण्यात आलेले नाही. अमेझॉन प्राइम व्हिडिओने यासंबंधी माहिती देताना म्हटलं की, शकुंतला देवी बायोपिकचा प्रीमिअर २०० देशांमध्ये आणि या क्षेत्रातील खास व्यक्तींसाठी वेगळ्या पद्धतीने केला जाणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”