सोलापूर प्रतिनिधी । गेल्या सहा-सात वर्षांपासून तब्बल १८३ कोटींची थकबाकी असलेला करकंब येथील विजय शुगर हा कारखाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी लिलावात काढला. या लिलावामध्ये माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी या कारखान्यासाठी १२५ कोटी १० लाख रुपये मोजले आहेत. त्यामुळे बँकेचा एनपीए झपाट्यान कमी झाला होता.
राजकीय दृष्ट्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून बबनदादा शिंदे यांना ओळखले जाते. त्यामुळे मोहिते- पाटीलांचा करकंब येथील कारखाना शिंदेंनी विकत घेतल्याने जिल्ह्यात चर्चांना उधान आले आहे. काही वर्षांपूर्वी विविध कारणांमुळे तो कारखाना अडचणीत आला होता. जिल्हा बँकेने दिलेले सुमारे पावणे दोनशे कोटींचे कर्ज कारखान्याकडे थकीत होते. त्याचा परिणाम बँकेच्या एनपीएवर झाला होता. तसेच जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडील थकबाकीमुळे मागील काही वर्षांपासून शेती कर्जवाटप बंद होते.
या वसुलीमुळे आता जून २०२० पासून शेती कर्जवाटपाचा मार्ग मोकळा झाल्याचा विश्वास प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी व्यक्त केला. तसेच आमदार दिलीप सोपल यांच्या बार्शीतील आर्यन शुगरची वसुली सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.