सातारा प्रतिनिधी । दीड महिन्यापासून पोलिसांना सातत्याने चकवा देणार्या विकास लाखे खून प्रकरणातील दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. अर्जुन पोळसह त्याच्या साथीदाराचा यात समावेश आहे. दोन्ही संशयितांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की आगाशिवनगर येथे विकास लाखे हा संजय रैनाक यांच्या पोल्ट्री फॉर्मच्या मागे पत्यांचा क्लब चालवत होता. बुधवार, 5 नोव्हेंबरला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विकास लाखे, निशिकांत ढेकळे, महेश अहिवळे, राजू कुडाळकर हे क्लबधून बाहेर पडले आणि रस्त्याच्या दिशेने चालत निघाले. यावेळी पोल्ट्रीच्या परिसरात आल्यावर संशयितांनी विकास लाखेच्या दिशेने गोळीबार केला होता.
गोळीबाराच्या आवाजामुळे निशिकांत ढेकळे, महेश अहिवळे हे तेथून पळून गेले. तर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी विकास लाखेला जॅकवेल रस्त्यावर गाठून त्याच्यावर पाठीमागून गोळ्या झाडल्या होत्या. विकास लाखे याच्या खुनानंतर संशयितांनी पलायन केले होते. त्यामुळे लाखे याच्या नातेवाईकांनी व समर्थकांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हल्लेखोर गेली दीड महिने पोलिसांना गुंगार देत फिरत होते. दरम्यान, प्राथमिक चौकशीतून अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे समोर आली होती. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी राज्यासह परराज्यातही संशयितांचा शोध घेत तब्बल 9 ते 10 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. अखेर हल्लेखोर महाराष्ट्र सोडून जाण्याच्या तयारीत असताना कराड गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने दोघा संशयितांना अटक केली.