कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लॉकडाऊनमुळे दवाखान्यात पेशंट सोबत राहणाऱ्या व्यक्तीला स्वादिष्ट व रुचकर जेवण उपलब्ध व्हावे. याकरता स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मलकापूरच्या नगरसेविका कमलाताई कुराडे यांनी सुरु केलेल्या ‘पौस्टीक ‘जेवणाचा डबा विनामूल्य’ या मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गेल्या एका महिन्यात 1 हजार 500 पेशंट व त्यांचा नातेवाईकांना “विलाश्री थाळी” लाॅकडाऊनमध्ये आधार ठरलेली पहायला मिळत आहे. कराड तालुक्यातील मलकापूर येथील युवा मित्र जयंतशेठ कुराडे व हॉटेल सातारी गावरान ठसकाचे मालक प्रशांत पाचपुते यांच्या संकल्पनेतून दवाखान्यात मोफत पोहच डब्बा ही मोहीम सुरु आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे पेशंटसोबत असणाऱ्या नातेवाईकांचे हाल होऊ नयेत, यासाठी हा उपक्रम त्यांनी हाती घेतला. मात्र गेल्या आठवडाभरात दररोज सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पाऊस पडत आहे. तरीही ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता दररोज गरजू लोकांपर्यंत विनामूल्य डब्बा पोहोच करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांना लाभत आहे.
अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, हाॅस्पीटलमधील लोकांसाठी विनामूल्य जेवणाचा उपक्रम चांगला आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत गरजेच्या वेळी चांगले जेवण मिळत आहे. कुराडे आणि पाचुकते बंधूनी यांनी राबविलेल्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो.
जयंत शेठ मित्रपरिवार यांच्या या उपक्रमाचे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, कोयना बँकेचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह विविध स्तरातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.