सातारा प्रतिनिधी । काँग्रेसचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विलासराव पाटील – उंडाळकर यांची सातारा येथील त्याच्या राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. पहिल्यांदाच पृथ्वीराज चव्हाण यांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन नेत्यांच्या गटात वैमनस्य आहे. मध्यंतरी त्यांच्यातील तणाव आणखी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे या भेटीची चर्चा होते आहे.
सध्या विधानपरिषदेच्या १२ जगासाठी उमेदवार निवडीची कार्यवाही सुरु आहे. यामध्ये काँग्रेसलाही स्थान मिळणार आहे. या भेटीमुळे दोन्ही गटातील वैर कमी करण्याचे प्रयत्न झाल्याचे तसेच त्यात यश आल्याची चर्चा आहे. यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. या दोन्ही गटाच्या मिलनाची सुरुवात मलकापूर पालिकेच्या निवडणुकीपासून सुरु झाली आहे. मलकापूर मध्ये चव्हाण गटाच्या मनोहर शिंदे यांना उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी मदत केली होती. आता असेच कराड दक्षिणमध्ये केले जात आहे.
मुंबईला जाण्याआधी या दोन मंत्र्यांनी काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चाना वाट मोकळी झाली आहे. मात्र या दोन्ही नेत्यांनी पाटील-उंडाळकर यांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी भेट घेतल्याचे सांगितले आहे. या भेटीदरम्यान उदयसिंह पाटील देखील उपस्थित होते. जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थान पुन्हा निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. तसेच अॅडव्होकेट पाटील यांना विधानपरिषदेत उमेदवारी दिली जाईल का? अशाही चर्चा केल्या जात आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.