नांदगाव मार्गे साळशिरंबे- जिंती एस टी पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोना महामारी संकट, त्यातच अतिवृष्टीमुळे नांदगाव पुलाची झालेली दुरवस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एसटी सेवा विस्कळीत झाली.परिणामी कराड आगारातून नांदगाव मार्गे साळशिरंबे जिंतीला जाणारी एसटी वाहतूक बंद पडली आहे. पण आता एसटी रुळावर येत असून नांदगाव मार्गे जिंती ला जाणारी गाडी पूर्ववत सुरु करावी अशी मागणी नांदगाव चे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांच्यासह ग्रामस्थांनी कराड आगारप्रमुख विजय मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गतवर्षी 22 व 23 जुलै रोजी नांदगावला महापुराचा फटका बसला. दक्षिण मांड नदी वर असणार्या पूलाचे ग्रिल वाहून गेले.पूल धोकादायक बनला. त्यामुळे एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागली तरीही आम्ही या मार्गावरील एसटी सुरू करावी अशी मागणी केली नाही. मात्र नुकतेच पुलाचे संरक्षक ग्रिलचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला धोका उरलेला नाही.

काही दिवसांपूर्वी एसटीचा संप मिटला आहे.गाड्या धावू लागल्या आहेत. परंतु गरिबांचा रथ म्हणून ओळख असलेली एसटी आमच्या मार्गावर अजून धावत नाही. तरी नांदगाव, मनव, खुडेवाडी ,साळशिरंबे, महारुगडेवाडी, जिंती, अकाईचीवाडी आदी गावातील लोकांना उपयोगी ठरणारी एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी.

निवेदनावर कालवडे- बेलवडे उपसा जलसिंचन योजनेचे संचालक संभाजी पाटील, तुळशीदास शेटे,सुहास आवळे, रघुनाथ जाधव, राहुल पाटील, श्रीधर भंडारे, वसंत पवार ,अमर कदम, उदय चौधरी, अक्षय पाटील, निखिल कडोले, मोहित सुकरे आदींच्या सह्या आहेत.

पंधरा दिवसात एसटी फेऱ्या सुरू करु

नांदगाव ग्रामस्थांचे निवेदन वाचल्यानंतर आगारप्रमुख विजय मोरे यांनी परिस्थिती समजून घेतली. तसेच एसटी पूर्वपदावर येऊ लागली आहे. तुमची अडचण लक्षात घेऊन प्राधान्याने येत्या पंधरा दिवसात या मार्गावरील एसटी फेऱ्या सुरू करू असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment