हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवार उभे करत अर्ज दाखल केले जात आहेत. तर दुसरीकडे काही राजकीय मंडळींकडून देवदर्शन करत देवाकडेही विजयासाठी साकडे घातले जात आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच तुळजापूर दौऱ्यावर असताना तुळजा भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ दे, अख्खा पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असे साकडे घातले. त्यांनी घातलेल्या या साकड्याची चर्चा मात्र चांगलीच होऊ लागली आहे.
तुळजापूर दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी देवीकडे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईन असे साकडेही घातले. आता इराष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची सुप्रिया सुळे यांनी देवीकडे घातलेले साकडे पूर्ण होणार का? हे येणारा काळच सांगणार आहे.
दरम्यान सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. या सरकारमध्ये सध्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मात्र अडीच वर्षे पूर्ण झाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, असे खुद्द राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना वाटत आहे त्याचा काहीसा प्रत्यय खासदार सुप्रिया सुळे यांच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने आला आहे.