सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरतील बार्शी येथील शेंद्री गावात चक्क एका भटक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी गावात लग्न असल्यासारखी तयारी करण्यात आली. लालूशेठ असं त्या ‘बर्थ-डे डॉग’चं नावं. लोलूशेठ हा कुणाच्या घरचा पाळीव कुत्रा नाही, तर गावात भटकणारा कुत्रा आहे. लालूशेठ हे लोकांनी त्याला दिलेलं नाव. लालूशेठच्या वाढदिवशी फटाक्यांची आतषबाजी, बँड-बाजा, गावकऱ्यांसाठी गाव जेवणाची सोय करण्यात आली.
लालूशेठच्या वाढदिवसाची चर्चा सोलापूरसह पंचक्रोशीत सुरु आहे. लालूशेठला शुभेच्छा देण्यासाठी गावकऱ्यांनी डिजीटल फ्लेक्सही लावला. त्यावर “आज लालूशेठचा 16 वा वाढदिवस” असं लिहिलं होतं. गावात अनेक भटके कुत्रे आहेत. मात्र, त्यापैकी लालूशेठ जरा हटकेच. तो कधी कुणाला चावला नाही, विनाकारण अंगावर गेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यात कसलीच कसर सोडली नाही.
केकपासून गाव जेवणापर्यंत सगळी व्यवस्था करुन वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. एकीकडे सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी काही जण मुक्या जणावरांच्या जीवाशी खेळतात. दुसरीकडे, शेंद्री गावात भटक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शेंद्री ग्रामस्थांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.