ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं; आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली: मेटे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील विविध प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचं यावेळी चव्हाण यांनी सांगितलं होतं. आता याच मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं” असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. याबरोबरच मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी येत्या 27 जून रोजी मुंबईत दहा हजार मोटरसायकलींची रॅली काढण्यात येणार आहे. असं मेटे यांनी सांगितले. ते पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दिल्लीला जाऊन ठाकरे चव्हाणांनी लोकांना वेड्यात काढले…

यावेळी बोलताना मेटे म्हणाले, “पाच मे रोजी कोर्टाने मराठा समाजाचा आरक्षण रद्द केलं. पण एक महिना उलटला तरी सरकारने अजूनही फेरविचार याचिका दाखल केली नाही यापेक्षा निष्क्रियपणा दुसरा कोणता असू शकतो ? असा सवाल त्यांनी केला. आम्ही पाच तारखेपासून सांगतोय ते ऐकलं जात नाही माजी न्यायमूर्ती भोसले यांच्या समितीने सांगितलेलं ऐकायचं नाही याचा अर्थ सरकारला मराठा आरक्षणासाठी देणेघेणे राहिलेले नाही. केवळ दिल्लीला जाऊन ठाकरे चव्हाणांनी लोकांना वेड्यात काढले. दिल्ली भेटीला मराठा आरक्षणाचा विषय तोंडी लावायचा होता. राज्यात मराठा समाजाचा रोष वाढल्यामुळे दिल्ली भेट झाली. काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी ही भेट होती. प्रत्यक्षात मराठा समाजासाठी काहीच केलं नाही. ” असं म्हणत मेटे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

येत्या आठ दिवसात या समितीची घोषणा

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आम्ही गप्प बसणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात तज्ञांच्या बैठका घेण्यात येतील त्यानंतर जिल्हानिहाय मेळावे आणि मोर्चे काढण्यात येणार आहेत. हे मेळावे मूक असणार नाहीतर बोलकी असते न्याय मागणारे असतील संघर्ष करणारे असतील. असं सांगतानाच भोसले कमिटी प्रमाणे आम्ही कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत. समाजाच्या वतीने ही समिती नेमली जाईल येत्या आठ दिवसात या समितीची घोषणा केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पुण्यातून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात

मराठा आरक्षणासंदर्भात समाजाचे जनजागृती करण्यासाठी पुण्यातून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती मेटे यांनी दिली. पुण्यातून नगर त्यानंतर औरंगाबाद,जालना, सोलापूर मध्ये जाऊन दुसऱ्या टप्प्यात रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणी जाणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा मिळावे काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन चालू देणार नाही असंही सांगतानाच येत्या 27 जून रोजी मुंबई येथे दहा हजार मोटारसायकलींची रॅली काढण्यात येणार आहे. मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी ही बाईक रॅली काढण्यात येणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.

Leave a Comment