जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या दोन समर्थकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना रंगेहात पकडले आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे शुक्रवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून, याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर अत्तरदे यांचे काही समर्थक म्हसावद गावात मतदारांना पैसे वाटत असल्याची माहिती शिवसेनेचे कार्यकर्ते पवन सोनवणे यांच्यासह इतरांना मिळाली होती. सोनवणे यांनी अत्तरदे यांच्या समर्थकांना अडवत. त्यांच्या वाहनात बंद पाकिटात असलेली रोकड ताब्यात घेतलीये. त्याचबरोबर पैशांची पाकिटे घेऊन फिरणाऱ्या दोघांना देखील ताब्यात घेण्यात आलं. रंगेहात पकडल्यावर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची पोलखोल केल्याने ते निरुत्तर झालेत. दरम्यान या कार्यकर्त्यांकडू पोलिसांनी २१ हजारांची रोकड जप्त करून ती रक्कम भरारी पथकाकडे सोपविली आहे.
दरम्यान, मतदाराच्या चिठ्ठ्या पाहण्यासाठी गेलेल्या आपल्या समर्थकांना दादागिरी करून सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे रोकड असल्याचे जबरदस्तीने वदवून घेतले आहे. पैसे वाटण्याचा काहीही प्रकार घडला नसल्याचे चंद्रशेखर अत्तरदे यांनी सांगितले.