सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
माण तालुक्यातील दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेजचा मनमानी कारभार सुरू असून प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी कॉलेजचा पदभार स्वीकारल्यापासून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. चाैकशी करून कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी रयत शिक्षण संस्थेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना देण्यात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली.
याबाबतची धैर्यशील पाटील म्हणाले, दहिवडी येथील काॅलेजमध्ये प्राचार्य आणि उपप्राचार्य पती- पत्नी आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज विद्यार्थ्यांची प्रवेश फी, दाखल्याच्या नावाखाली भरमसाठ फी जमा करून गोरगरीब विद्यार्थ्यांची आणि पालकांची लूट केली जात आहे. महाविद्यालयात दाखले आणि प्रवेश फी संदर्भात गैरप्रकार चालू असून त्यांच्या या गैर कारभाराबाबत पालक वर्गातून तक्रारी येत आहेत. विद्यार्थ्यांना फी साठी उशीर झाला, तर विद्यार्थी आणि पालकांना विनाकारण त्रास दिला जात आहे. फी भरण्यास मुदत मागितल्यास दाखला काढून नेण्याबाबत दम देऊन विद्यार्थी आणि पालकांना अपमानित केले जात आहे.
विद्यालयात विविध कारणांसाठी सक्तीचे विषय देऊन वाढीव फी घेतली जात आहे. विनाअनुदानित तुकड्यांच्या नावाखाली फी घेऊनही विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने शिकवले जात नाही. याबाबत पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्यास पोलीस स्टेशनला अर्ज देऊन सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करण्याची धमकी कॉलेज कडून देण्यात येत असल्याचा आरोप धैर्यशील पाटील यांनी केला आहे.