हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे क्रिकेटपटू इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी देशांतर्गत रणजी सामने न खेळल्याने बीसीसीआयच्या करारातुन दोघांनाही वगळण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी या प्रकारावरून बीसीसीआयला लक्ष्य केलं आहे, तर काहींनी इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातच आता भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी या वादात उडी घेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही रणजी क्रिकेट खेळावं असं म्हंटल आहे.
कीर्ती आझाद म्हणाले, प्रत्येकाने रणजी ट्रॉफी खेळली पाहिजे. पाच दिवसांचे क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. त्यामुळे खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळणे चांगले आहे. मात्र खेळाडूंचे लक्ष्य हे आयपीएल वरच असते. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा खेळाडूंनी आपल्या राज्यासाठी रणजी क्रिकेट खेळले पाहिजे, मग ते रोहित शर्मा (Rohit Sharma) असो किंवा विराट कोहली (Virat Kohli) असो..कारण तुमच्या राज्याने तुम्हाला संधी दिली म्हणून आज तुम्ही देशासाठी खेळत आहात असेही कीर्ती आझाद यांनी म्हंटल. जर आपण भूतकाळात पाहिले तर आपल्या लक्षात येईल की बिशन बेदी, मदन लाल, सुरिंदर अमरनाथ, मोहिंदर अमरनाथ, चेतन चौहान, सुनील गावसकर, संदीप पाटील यांसारखे खेळाडू तरुणपणी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत.
कीर्ती आझाद पुढे म्हणाले, फक्त ईशान आणि श्रेयसला शिक्षा देणे योग्य नाही, तर जो जो नियमांचे उल्लंघन करेल त्या त्या खेळाडूंना शिक्षा झाली पाहिजे. सर्वाना समान न्याय मिळाला पाहिजे असेही त्यांनी म्हंटल. यावेळी कीर्ती आझाद यांनी ध्रुव जुरेल आणि सरफराज खानचे टी-२० क्रिकेट आणि रणजी ट्रॉफीमध्ये संतुलन राखल्याबद्दल कौतुक केले.