हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. हा सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ५०० वा सामना असून कोहलीने दमदार अर्धशतक झळकावले आहे. विराट कोहली सध्या 87 धावांवर खेळत असून त्याने शतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. परतू आपल्या 500 व्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे.
विराट कोहलीपूर्वी जगभरातील 9 खेळाडूंनी आत्तापर्यंत आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा,राहुल द्रविड, एमएस धोनी अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. परंतु आपल्या 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणालाही 50 धावा करता आल्या नाहीत. परंतु कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्ध नाबाद 87 धावा करून आपल्या नावे मोठा विक्रम केला आहे. कोहलीने 161 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. यावेळी त्याने शांत आणि संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. कोहलीची नजर आता ऐतिहासिक शतकावर असेल.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर 4 गडी गमावून 288 धावा केल्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्माने (80), यशस्वी जैस्वाल (57) धाव केल्या. तर शुभमन गिल (10) आणि अजिंक्य रहाणे (8) हे स्वस्तात बाद झाले. पहिल्या दिवसाअखेर विराट कोहली 87 आणि रवींद्र जडेजा 36 धावांवर खेळत आहेत.
500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू-
विराट कोहली – 87* (2023)
कुमार संगकारा – 48 (2013)
रिकी पाँटिंग – 44 (2010)
सचिन तेंडुलकर – 35 (2006)
एमएस धोनी – 32* (2018)
शाहिद आफ्रिदी – 22 (2015)
महेला जयवर्धने – 11 (2011)
जॅक कॅलिस – 6 (2012)
राहुल द्रविड – 2 (2011)
सनथ जयसूर्या – 1 (2007)